९५वे संमेलन बेळगावला?

(शं. ना. नवरे नाटय़नगरी, पंढरपूर) – पुढील वर्षी होणारे ९५वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन बेळगाव येथे व्हावे, अशी सूचना ९४व्या नाटय़संमेलनाच्या सांगता सोहळ्यात मांडण्यात आली. तिला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिल्याने पुढील वर्षीचे नाटय़ संमेलन बेळगावात होण्याची शक्यता आहे. वारक-यांची भूमी असलेल्या पंढरपूर येथील नाटय़ संमेलनाची सांगता रविवारी झाली.

या समारंभाला जलसंपदामंत्री सुनील तटकरे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल, न्याय, विधी व नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, आमदार दीपक साळुंखे-पाटील, लक्ष्मण ढोबळे, गणपतराव देशमुख उपस्थित होते. या समारंभात भाषण करताना राज्यमंत्री उदय सामंत यांनी पुढील संमेलन बेळगाव येथे घेण्याची सूचना केली. बेळगावात हे संमेलन घेऊन आपल्या मराठीची ताकद दाखवून देऊ. तसे झाल्यास मी स्वत: तिथे सात दिवस मुक्काम ठोकून संमेलनाची तयारी करेन, असे ते म्हणाले. त्यांच्या या सूचनेला सुनील तटकरे, दिलीप सोपल आणि लक्ष्मण ढोबळे या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला.

नाटय संमेलनाच्या सांगता सोहळ्याच्या व्यासपीठावरून मुंबईत आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सव करण्याची सूचनाही करण्यात आली. एनएसडीचे संचालक वामन केंद्रे यांनी मुंबईत या प्रकारचा महोत्सव करण्याची मागणी केली आहे. तो धागा पकडून राज्यमंत्री उदय सामंत यांनी हा महोत्सव करण्याची सूचना केली. यासाठी तटकरे यांनी पुढाकार घेतल्यास आम्ही सगळे या महोत्सवासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितल्यावर तटकरे यांनी या सूचनेलाही सहमती दर्शवली.

समारोप सोहळ्यात सुनील तटकरे, लक्ष्मण ढोबळे, दिलीप सोपल, स्वागताध्यक्ष भारत भालके यांची भाषणे झाली. नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांना आपले भाषण थोडक्यात उरकावे लागले. न्याय, विधी व नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमात पंढरपूरच्या विकासासाठी सव्वा कोटी रुपये जाहीर करून नाटय़ संमेलन भरवल्याची बक्षिसी दिली.

Leave a Comment