विद्यार्थ्यांचे स्थलांतर

भारतात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असून उत्तर प्रदेश आणि बंगालमधील विद्यार्थी प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात शिक्षणासाठी जात असल्याचे दिसून आले आहे. शिक्षण हा किती मोठा व्यवसाय झाला आहे याचा अंदाज या स्थलांतरावरून येतो. पूर्वीच्या काळी चार-दोन शाळा, महाविद्यालये काढणार्‍या कार्यकर्त्यांना शिक्षण महर्षी म्हटले जात असे. परंतु आता शिक्षणाचा व्यवसाय करणारे केवळ महर्षीच आहेत असे नाही तर ते अब्जोपती झालेले आहेत आणि त्यांच्या उत्पन्नाला हे स्थलांतरित विद्यार्थी मोठा हातभार लावत आहेत. स्थलांतर ही गोष्ट आपल्याला तशी नवी नाही. अलीकडेच करण्यात आलेल्या काही पाहण्यांमध्ये असे आढळले आहे की, भारताच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्या ही कोठून ना कोठून तरी स्थलांतरित होऊनच आपल्या जागेवर स्थिर झालेली आहे. म्हणजे भारताच्या लोकसंख्येतल्या दर तीन माणसांमागे एक माणूस स्थलांतरित आहे. तशी मानवी जात आणि जातीतले विविध वर्ग सातत्याने स्थलांतरच करत आलेले आहे. परंतु पुरातन काळापासून सुरू असलेले हे स्थलांतर पोटापाण्यासाठी झालेले आहे. आजवरच्या इतिहासामध्ये शिक्षणासाठी स्थलांतर कधी झालेले नव्हते.

एखादा कलाकार अमूक एका गावात एक चांगले गुरु आहेत म्हणून चालत चालत त्या गावापर्यंत गेला. शंकराचार्य, विवेकानंद यांनी आपल्या गावातून बाहेर जाऊनच गुरु मिळवले, पण हे स्थलांतर वैयक्तिक आणि अपवादात्मक होते. जुन्या काळात बहुतेक लोकांनी आपल्या व्यवसायाचे किंवा जातीगत धंद्याचे शिक्षण आपल्या कुटुंबात किंवा गावात मिळेल तेवढे मिळवले आणि त्यावर पोट भरण्यात समाधान मानले. परंतु आजच्या काळात झालेले स्थलांतर हे शिक्षणासाठीचे स्थलांतर आहे. शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जातात, ही गोष्ट शिक्षणाचे महत्व कळाल्याचे द्योतक आहे. म्हणजे समाजाला आता शिक्षणातून विकास घडविण्याचे महत्व कळायला लागले आहे. अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातले एक छोटे राज्य आहे. तिथला हा विद्यार्थी दिल्लीत का आला होता, असा प्रश्‍न साहजिकच निर्माण होतो. मात्र केवळ दिल्लीच नव्हे तर भारतातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये अन्य राज्यातली मुले मोठ्या प्रमाणावर आलेली दिसतात. त्यांच्या या स्थलांतरामागे शिक्षण घेण्याचा हेतू आहे.

शिक्षणासाठी भारतात अंतर्गत स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातली मुले मोठ्या संख्येने शिक्षणासाठी आपल्या राज्याच्या बाहेर जाताना दिसतात. ज्या राज्यांमध्ये शिक्षणाच्या सोयी नाहीत त्या राज्यातले विद्यार्थी चांगल्या शिक्षणाच्या आशेने परराज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये जात आहेत आणि भारतातले हे एक मोठे स्थलांतर आहे. अशा स्थलांतराचे अनेक चांगले-वाईट परिणाम समाजावर होत असतात. म्हणून या स्थलांतराचा अभ्यास होण्याची गरज आहे आणि एका स्वयंसेवी संघटनेने हा अभ्यास करून असे दाखवलेले आहे की, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या दोन राज्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने परराज्यात शिक्षणासाठी जात आहेत.

खरे म्हणजे ईशान्य भारतातील लहान-लहान राज्यांतून म्हणजे मणिपूर, मिझोराम याही राज्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने परराज्यात जात आहेत. परंतु या राज्याची लोकसंख्या मुळातच कमी आहे आणि त्यांचे विद्यार्थी शिक्षणासाठी परराज्यात गेल्यावर त्यांची संख्या तिथे म्हणावी तशी जाणवत नाही. मात्र त्यांचे स्थलांतर आहे आणि त्या स्थलांतरावरून त्या राज्यातल्या उच्च शिक्षणाच्या दर्जावर मोठा प्रकाश पडत आहे. पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश ही दोन मोठी राज्ये आहेत. उत्तर प्रदेशची लोकसंख्या १८ कोटी तर पश्‍चिम बंगालची लोकसंख्या ९ कोटी आहे. मात्र उत्तर प्रदेशात मुळातच मागासलेपण जास्त आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षणाच्या सोयी फार कमी आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचे सरकार ३०-३५ वर्षे सत्तेवर होते. परंतु या सरकारला राज्याची म्हणावी तशी प्रगती करता आली नाही. स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे हे पक्ष फक्त पुरोगामी घोषणा करत राहिले, राज्य मात्र मोठ्या प्रमाणावर मागासलेलेच राहिले. त्यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे तर मजुरांनी सुद्धा या राज्यातून मोठे स्थलांतर केलेले आहे.

केरळमध्ये परराज्यातून येणार्‍या मजुरात पश्‍चिम बंगालची संख्या सर्वाधिक असते. बंगालच्या परिस्थितीवर मोठाच प्रकाश टाकणारी ही घटना आहे. अजूनही तिथे ममता बॅनर्जी यांनी प्रगतीची फार चांगली झेप घेतली आहे असे दिसत नाही. त्यामुळे बंगाल हे मागासलेले राज्य म्हणून ओळखले जाते. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना मिळून बिमारी स्टेट म्हटले जाते. पण या बिमारू स्टेटपेक्षा पश्‍चिम बंगालच अधिक बिमार आहे. गेल्या दहा वर्षात पश्‍चिम बंगालमधून ५२ हजार विद्यार्थ्यांनी परराज्यांमध्ये शिक्षणासाठी स्थलांतर केलेले आहे. उत्तर प्रदेशाचा हा आकडा मोठा आहे. या राज्यातील १ लाख १० हजार विद्यार्थी शिक्षणासाठी परराज्यात गेलेले आहेत. शिक्षणासाठी होणार्‍या या स्थलांतरातून विद्यार्थ्यांची चांगली शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त होतेच, शिवाय परराज्यात जाऊन शिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च करण्याची पालकांची तयारी सुद्धा दिसते आणि या गोष्टी शिक्षणाचे महत्व लोकांना कळत असल्याचे दाखवून देतात. शिक्षणासाठी स्थलांतर होऊच नये असे काही कोणी म्हणू शकत नाही. परंतु विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात शिक्षण मिळावे हे अधिक योग्य आहे. पण दुर्दैवाने सर्व राज्यांची शैक्षणिक प्रगती समानतेने होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याकरिता गाव सोडून इतरत्र जावे लागते.

Leave a Comment