कर्नाटकने पटकाविले रणजी विजेतेपद

हैदराबाद – महाराष्ट्राचा अंतिम सामन्यात सात गडी राखून पराभव करत कर्नाटक संघाने सातव्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. चौदा वर्षांनंतर कर्नाटकला रणजी करंडक मिळविण्यात यश आले आहे. महाराष्ट्राने आज (रविवार) शेवटच्या दिवशी 366 धावा करत कर्नाटकपुढे विजयासाठी 157 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान कर्नाटकने तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळविला. महाराष्ट्राच्या श्रीकांत मुंढेने केलेल्या 42 धावांमुळे महाराष्ट्राला कर्नाटकपुढे दीडशेच्या पार आव्हान ठेवता आले. कर्नाटकने या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरवात केली.

रॉबिन उथप्पाने 36 धावा केल्या. तर, तिसऱ्या स्थानावर आलेल्या अमित वर्माने 38 धावांची खेळी केली. या विजयात कर्णधार विनय कुमारचा मोलाचा वाटा होता. ‘क’ गटातून बाद फेरी गाठलेला महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत सहज “बाद’ होत नाही म्हटल्यावर कर्नाटकने अखिलाडूवृत्तीचे अशोभनीय प्रदर्शन करतानाच रडीचे डावपेच लढविले होते. मोसमात सर्वाधिक धावा केलेल्या केदार जाधवची झुंजार शतकी खेळी रोखणे, त्याची चिरागबरोबरची भागीदारी संपविणे; तसेच महाराष्ट्राचे प्रतिआक्रमण मोडून काढणे कर्नाटकला त्यामुळेच शक्‍य झाले होते. कर्नाटकचा पहिला डाव सात बाद 474 वरून 515 धावांत संपला होता. चौथ्या दिवसअखेर महाराष्ट्राने सहा बाद 272 अशी संघर्षपूर्ण वाटचाल केली. महाराष्ट्राने 62 धावांची आघाडी घेतली होती.

वास्तविक फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांनंतरसुद्धा महाराष्ट्राने चमत्कार घडविण्याची सुवर्णसंधी निर्माण केली होती; पण आक्रमणाला संयमाची जोड देण्यात अपयशी ठरलेले सलामीवीर खडीवाले- झोल, जम बसल्यानंतर चुकीच्या चेंडूवर पुढे सरसावून चकलेला बावणे, जम बसण्यापूर्वीच धोका पत्करलेला संग्राम यांच्यामुळे आव्हानातील हवा कमी झाली. त्यानंतरही चिराग- केदार यांनी 88 धावांची भागीदारी रचली, तेव्हा कर्नाटकच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशा वेळी कर्णधार विनय, उथप्पा यांच्यासारख्या राष्ट्रीय संघातील स्थान गमावलेल्या “फ्लॉप स्टार्स’सह कर्नाटकच्या सर्वच खेळाडूंनी शेरेबाजी करून चिराग- केदारला डिवचण्यास सुरवात केली. यात अरविंद, मिथुन, करुण नायर, यांचीही “साथ’ होती. हे कमी की काय म्हणून विनयने यष्टीबाहेर फुलटॉस टाकण्याचे रडीचे डावपेच अवलंबिले, यामुळेच चिराग व केदारला सहा धावांच्या फरकाने बाद करीत कर्नाटकने निसटत चाललेली पकड पुन्हा मिळविली.

महाराष्ट्राचा डाव सुरू होताच निर्णायक विजयासाठी प्रयत्न करण्याऐवजी कर्नाटकने बचावात्मक क्षेत्ररक्षण लावले. महाराष्ट्राचे फॉर्मातील फलंदाज चौकार मारणार नाहीत यावरच त्यांचा कटाक्ष होता. यामुळे एकेरी- दुहेरी धावा देण्यात समाधान मानणाऱ्या कर्नाटकचे डावपेच महाराष्ट्राने त्यांच्या अंगलट आणले होते. बावणे- केदार यांनी 118 धावांची भागीदारी केली तेव्हा कर्नाटकच्या तोंडचे पाणी पळाले होते. अशा वेळी “राउंड दी विकेट’ येत खेळपट्टीवरील “स्पॉट’मध्ये टप्पा टाकणाऱ्या गोपाळसमोर बावणे व संग्रामने विकेट टाकल्या.

Leave a Comment