जागतिक सुरक्षितता चाचणीत भारतीय कार नापास

लंडन – भारतातील वाहन उद्योग वेगाने वाढत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन कंपन्या वेगवेगळी कारची मॉडेल्स बाजारात आणत आहे. प्रत्येक कंपनी आपल्या कारचे वैशिष्टये दाखवून ग्राहकांना खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, सुरक्षिततेच्या बाबतीत या कारची कामगिरी ग्राहकांना निश्चितपणे काळजीत टाकणारी आहे.

‘ग्लोबल न्यू कार ऍसेसमेंट प्रोग्राम’ (जीएनसीएपी) या जागतिक संस्थेने भारतातील लहान कारच्या सुरक्षिततेची तपासणीसाठी ‘क्रॅश’ टेस्ट घेतली. यात देशातील लोकप्रिय कार्स नापास ठरल्या आहेत. लंडनच्या ‘ग्लोबल न्यू कार ऍसेसमेंट प्रोग्राम’चे प्रमुख डेव्हिड वार्ड यांनी भारतीय कारच्या सुरक्षिततेचा अहवाल जाहीर केला. वाहनांचे अपघात रोखायचे असल्यास चालकांना प्रशिक्षीत करण्याबरोबरच त्यांना नियमांच्या चाकोरीत बांधायला हवे.

मात्र भारतात नेमका याचाच अभाव असल्याचे वॉर्ड यांनी सांगितले. जीएनसीएपीने देशातील मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या टाटाची नॅनो, मारुतीची अल्टो ८००, हुंडाईची आय १० आणि फोक्सवॅगनच्या पोलो या कारची क्रॅश टेस्ट घेतली. यात सर्व कार सपशेल नापास ठरल्या. या कारमध्ये सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याचे आढळले.

या अहवालावर कार कंपन्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या. कारची सुरक्षितता हा गुंतागुंतीचा विषय आहे. प्रवाशांबरोबरच रस्त्यांवरील अन्य बाबींचीही सुरक्षा महत्त्वाची आहे. कारचे स्टिअरिंग, ब्रेक्स, चालकांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्याची माहिती देणे गरजेचे आहे. भारतातील रस्ते खराब आहे. गरजेपेक्षा जास्त वाहनांनी भरलेले रस्ते, पावसाळा आणि कडक उन्हाच्या परिणामामुळे रस्ते लवकर खराब होतात.

रस्त्यावर बैलगाड्या, सायकलस्वार आदी फिरत असल्याने चालकावर मोठ्या प्रमाणावर मर्यादा येतात. आम्ही कारच्या रचनेकडे अधिक लक्ष देणार असून त्याची मजबुती निश्चितपणे वाढू शकेल. आम्ही यापूर्वीच्या कारच्या डायनामिक्समध्ये बदल केला असून पॉवर स्टीअरिंग बसवली आहे, असे एका कंपनीने सांगितले.

चालकांच्या सुरक्षेसाठी एअर बॅग्ज, ऍँटी लॉक ब्रेक्स बसवले आहे. मात्र त्यामुळे वाहनाच्या किंमतीत वाढ झाल्याचे कंपनीने जाहीर केले. भारतात मध्यमवर्गाची लोकसंख्या वाढत आहे. स्वत: च्या मालकीचे वाहन असणे ही या वर्गाची गरज बनली आहे. त्यामुळे वाहन उद्योगाची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र, सुरक्षिततेच्या नावावर सगळीच बोंब आहे. देशात गेल्यावर्षी ३२ लाख कारचे उत्पादन झाले. ग्राहकांनी कार खरेदी करताना सुरक्षिततेकडे लक्ष देणे टाळले. सुरक्षेचा अभाव आणि खराब रस्त्यांमुळे भारतातील रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्युचे प्रमाण अमेरिकेपेक्षा सहापट तर चीनपेक्षा तिप्पट आहे. रस्त्यावरील अपघातात मृत्यू होणार्‍यांमध्ये १० पैकी एकजण भारतीय असतो, असे अहवालात नमूद केले.