महायुती अस्वस्थ

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजप जवळ करणार असेल तर महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी दिला. तसेच मंत्रिपद मिळाले नाही तर पुढे काय करायचे ते बघून घेऊ, असा दमच रामदास आठवले यांनी इचलकरंजी येथे झालेल्या महायुतीच्याच जाहीर सभेत भरला. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच महायुती फुटीच्या उंबरठयावर उभी आहे.

शिवसेना, भाजप, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पार्टी या पाच पक्षांनी एकत्र येऊन महायुती केली आहे. महायुतीची पहिलीच सभा नुकतीच इचलकरंजी येथे पार पडली. कॉंग्रेस आघाडीचा पराभव करण्याची गर्जना या सभेतून महायुतीच्या नेत्यांनी केली. मात्र सभेला एक दिवस उलटत नाही तोच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत कथित भेट झाल्याची बातमी समोर आली. त्यामुळे एकच राजकीय गोंधळ निर्माण झाला.

ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जास्तच गंभीर्याने घेतली. भाजप पवारांना बरोबरीने घेणार असेल तर महायुतीतून बाहेर पडू, असा इशाराच त्यांनी तातडीने दिला. तर रामदास आठवले आता पासूनच मंत्रिपदासाठी सेना-भाजपच्या नेत्यांच्या पाठी लागले आहेत. मंत्रिपद न मिळाल्यास वेगळा मार्ग धरण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूकीपूर्वीच महायुतीच्या फुटीचा पहिला टप्पा सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

मोदी आणि पवार यांच्या कथित भेटीने शुक्रवारी दिवसभर राजकीय घडामोडींना वेग येत गेला. मोदी यांची कधीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण स्वत: शरद पवार यांनी दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही दोन्ही नेत्यांची अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र या राजकीय गोंधळामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Leave a Comment