पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात सहभागाच्या संशयावरून अटकेत असलेला गुन्हेगार मनीष ऊर्फ मन्या नागोरीची पोलिसांकडून चांगलीच ‘बडदास्त’ ठेवली जात असल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात सहा पोलिस कर्मचा-यांच्या बंदोबस्तात असलेल्या नागोरीला सिगारेटचे झुरके सोडताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी ‘कैद’ केले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच महिने उलटले तरी अद्याप हल्लेखोरांचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सीबीआयची मदत घेण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर तीनच दिवसांनी गुन्हे शाखेच्या पथकाने नागोरी व त्याचा साथीदार विकास खंडेलवाल या गुंडांना ठाणे कारागृहातून ताब्यात घेतले. शस्त्र तस्करी करणा-या नागोरीकडून वितरित झालेल्या ७.६५ एमएम पिस्टलमधूनच दाभोलकरांची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. सदर गुन्हयात दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी शुक्रवारी दुपारी आयुक्तालयात नागोरी व खंडेलवाल यांची चौकशी केली. त्यानंतर शेजारी अर्धवर्तुळाकार बैठक व्यवस्थेत त्यांना ठेवण्यात आले. या ठिकाणी शस्त्रधारी पोलिसांच्या पहा-यात नागोरीचे सिगारेट ओढणे सुरू होते. याबाबत पत्रकारांनी फुगे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी हवालदारास बोलावून झाडाझडती घेतली. कॅन्टीनमधील मुले त्याला सिगारेट पुरवत असल्याचे सांगून हवालदारानेही आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
ऍड. बी.ए.अलूर यांनी नागोरी व खंडेलवाल यांचे वतीने न्यायालयात आरोपींच्या पोलिस कोठडी विरोधात अपील दाखल केले आहे. न्यायालयाने तपास अधिकारी व सरकारी वकील यांना केस डायरीसह एक फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावलेली आहे.