महायुतीने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

कोल्हापूर – महायुतीने आज इचलकरंजीत सभा घेवून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शिवसेना, भाजप, आरपीआय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सर्वच पक्षांनी आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागत लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करतांनाच महायुतीच्या नेत्यांनी उपस्थितांना आश्वासनांची खैरात वाटत इलेक्शन सीझन सुरू झाल्याची चाहुल दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी महायुतीच्या सर्वच्या नेत्यांना शरद पवार आणि आघाडीच्या मंत्र्यांच्या घोटाळ्यांचा जोरदार समाचार घेतला.

शरद पवारांनी निवडून येण्याची शाश्वती नसल्यानंच त्यांनी राज्यसभेचा मार्ग निवडल्याचा आरोप गोपीनाथ मुंडेंनी केला. तर उद्धव ठाकरेंनी पुन्हा हिंदू असणे म्हणजे धर्मांधता नव्हे असं सांगत हिंदुत्वाचा नारा दिला. राज्यात उद्योगांबाबत योग्य धोरण नसल्याने राज्यातले उद्योग इतरत्र स्थलांतरीत होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. महायुतीने लोकसभेचे रणशिंग फुंकले असून 16 फेब्रुवारीला बीडमध्ये सभा घेणार असल्याचेही देखील उद्धव यांनी जाहीर केले गोपीनाथ मुंडेंनी पवार काका-पुतण्यावर जोरदार हल्लाबोल केला. हिम्मत असेल तर अजित पवारांनी बीडमधून निवडणूक लढवावी असे आव्हानच मुंडेंनी दिले. घोटाळखोर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना चाबकाने फोडणार असल्याचं मुंडेनी म्हटले.

घोटाळ्यांचे पुरावे नष्ट करण्यासाठीच मंत्रालयाचा आग लावण्यात आल्याचे मुंडेंनी सांगितले. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर मंत्रालयीन आगीची चौकशी करणार असल्याचे मुंडे म्हणाले. टोलव्दारे काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्राला लुटते असल्याचे मुंडेंनी सांगितले. साखर उद्योगातील पवारांची मक्तेदारी मोडून उखण्याचे आव्हानही मुंडेंनी दिले. पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करतांना मुंडेंनी वीजदर कपात आणि टोलमाफीची आश्वासनं दिलं. महायुतीची सत्ता आल्यास शेतकºयांसाठीचा वीजदर 50 टक्क्यांनी कमी करणार असल्याचे देखील मुंडे म्हणाले. त्यामुळे एका बाजुला काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल आणि दुसरीकडे मतदारांसाठी आश्वासन असा दुहेरी हेतू साधत महायुतीच्य नेत्यांनी मतांची पेरणी करण्याची प्रयत्न केला. राजू शेट्टीच्या येण्याने महायुती पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता महायुतीत आणखी कोणाची गरज नसल्याचे आरपीआय नेते रामदास आठवले म्हटले. त्यामुळे याआधी राज ठाकरेंनी खुले आमंत्रण देणाºया आठवलेंची सूर अचानक बदलल्याचे चित्र आहे.

आपल्या शेरोशायरीने आठवलेंनी वातावरणात चांगलाच हशा पिकवला. महायुती महाराष्ट्राला टोलमुक्त आणि काँग्रेसमुक्त करण्यासाठी मैदानात उतरल्याचे आठवलेंनी स्पष्ट केले. गरिबांच्या योजनांचे पैसे काँग्रेस राष्ट्रवादीने खाल्ल्याचा आरोप करत भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर तोफ डागली. सिंचन घोटाळ्यातील कोट्यवधी रुपये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हडपले, त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादीला सत्तेतून हाकलण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले. महायुतीची सत्ता आल्यास वीज कंपन्यातील घोटाळे बाहेर काढण्याचे आश्वासनेही यावेळी फडणवीस यांनी दिले. तसेच महायुतीची सत्ता आल्यानंतर ६ महिन्यात राज्यात टोल बंद करण्याचे देखील भाजप नेते विनोद तावडें यांनी सांगितले. नव्यानत महायुतीत दाखल झालेल्या राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. आघाडी सरकारनं आतापर्यंत शेतकºयांना लुटले, निव्वळ खाबूगिरी केली असे म्हणते राजू शेट्टींनी आघाडी सरकारवर आसूड ओढले. सरकारमधील मंत्री साखरेचा सट्टा खेळतात. साखर कारखाने बंद करून ते आपल्या ताब्यात घेण्याचा काँग्रेस – राष्ट्रवादीचा डाव असल्याचा आरोपही यावेळी शेट्टी यांनी केला. शरद पवारांनी राज्यात टोलला सुरूवात केली आणि त्यामुळं अशा नेत्यांना सत्तेपासून खाली खेचा असे आवाहन यावेळी शेट्टींनी केले.