हात दाखवून अवलक्षण

राहुल गांधी यांची मुलाखत म्हणजे हात दाखवून अवलक्षण या मराठी म्हणीचा साक्षात्कार ठरला आहे. कारण एखादा माणूस मोठ्या हौसेने ज्योतिषाला हात दाखवतो पण तो ज्योतिषी नेमके त्याच्यावरच्या अरिष्टाचे आणि संकटांचे भविष्य सांगतो तेव्हा त्या हौसी माणसाची जी अवस्था होते तीच नेमकी राहुल गांधींची झाली आहे. आपली प्रतिमा सुधारावी म्हणून कधी नव्हे ते त्यांनी टाईम्स नाऊ या चॅनेलला मुलाखत दिली आणि ती मुलाखत त्यांच्यावर अशी काही उलटली आहे की पुढचे दोन तीन महिने तरी राहुल गांधी कुणाला मुलाखत तर देणार नाहीतच पण साधा पत्रकार बघितला तरी त्यांच्या अंगावर काटा येईल. त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये १९८४ च्या शीखविरोधी दंगलीचा विषय उपस्थित करून आ बैल मुझे मार या न्यायाने आपत्ती ओढवून घेतली आहे. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलींचा उल्लेख अलिकडे कोणत्याही निवडणुकीत होत नव्हता. कारण १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांनीच त्या विषयाला त्यांच्याकडून तरी पूर्णविराम दिला होता. शीख विरोधी दंगलीबद्दल त्यांनी शीख समाजाची माफी मागितली होती. तरीही सीबीआयकडून चौकशी चालू होती आणि त्या चौकशीच्या दरम्यान एखादे प्रकरण पुढे आलेच तर तेवढ्यापुरती चर्चा होत असे.

राजकीयदृष्ट्या कॉंग्रेसला या दंगलीचा काही उपद्रव व्हावा असे वातावरण नक्कीच नव्हते. पण काही गरज नसताना, अपेक्षा नसताना आणि कसलीही राजकीय चर्चा उपस्थित झालेली नसताना राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांना या मुलाखतीतील प्रश्‍नांची उत्तरे कोणी लिहून दिली होती माहीत नाही परंतु त्यामागे परिपक्वतेचा पूर्ण अभाव असल्यामुळे ही मुलाखत त्यांच्यावर उलटली आहे. हा विषय त्यांना उपस्थित करायचाच असता तर तो दोन आधारावर करता आला असता. पहिला म्हणजे पूर्णपणे प्रांजळतेने त्या दंगलीची जबाबदारी स्वीकारणे आणि शीख समाजाची माफी मागणे. दुसरा आधार म्हणजे या प्रकरणावर बोलताना फार हुशारीने तोलून मापून बोलून त्याचा राजकीय फायदा घेणे. या दोन्ही गोष्टी राहुल गांधींना जमल्या नाहीत. बोललेला प्रत्येक शब्द योजनापूर्वक बोलावा एवढे चातुर्य त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यातल्या प्रत्येक वाक्या वाक्यावर आता श्‍लेषही काढले जायला लागले आहेत आणि त्यावर सवाल जवाब सुरू झाले आहेत. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी या दंगलीत भाग घेतला ही गोष्ट खरी आहे. असे राहुल गांधींनी कबूल केले. हे वाक्य त्यांना साधे, सोपे, निरुपद्रवी वाटले असेल परंतु आता त्याच वाक्याचा उपयोग करून शीख समाजाच्या धार्मिक संघटनेने त्यांना अडचणीत आणायला सुरूवात केली आहे.

काही कॉंग्रेस नेत्यांनी या दंगलीत भाग घेतला हे राहुल गांधींना माहीत होते. तर ते आजवर गप्प का बसले असा सवाल शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने उपस्थित केला आहे. त्याशिवाय या दंगलीत कोणकोणत्या कॉंग्रेस नेत्यांनी भाग घेतला हे राहुल गांधींना माहीत असेल तर ते त्यांनी जाहीर करावे. अशी मागणी आता या संघटनेनी केली आहे. यावर आता राहुल गांधी काय उत्तर देणार आहेत? ही नावे आपल्याला माहीत नाहीत असे उत्तर द्यावे तर तेही सोयीचे नाही. कारण नावे माहीत नाहीत तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाग घेतला हे विधान त्यांनी कशाच्या आधारे केले हे सांगावे लागेल आणि ही नावे माहीत आहेत असे म्हणावे असे सांगावे तर तेही सोयीचे नाही. कारण नावे माहीत आहेत तर ती सांगत का नाहीत आणि सांगत नाही याचा अर्थ त्यांना पाठिशी घालता असा होतो. एकंदरीत आम्ही शीखविरुध्द दंगली केल्या तशा मोदींनी मुस्लीमांच्या विरोधात केल्या असे चित्र उभे करून मुस्लीमांची सहानुभूती मिळवण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न होता. पण तो फसला. उलट राहुल गांधीच या सार्‍या प्रकरणात फसले. एकामागे एक कबुली देऊन कॉंग्रेसचे नेते शीख विरोधी दंगलीतील आरोपी ठरले. किंबहुना त्यांनी स्वतःच तसे जाहीर केले.

नरेंद्र मोदी मात्र एका शब्दानेही कबुली देत नाहीत. शिवाय त्यांच्यावर कोणत्याही न्यायालयाने कधी ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे त्यांना दंगेखोर ठरवण्याचा राहुल गांधींचा डाव त्यांच्यामुळेच उधळला गेला. मोदी तर मुस्लीमविरोधी ठरले नाहीतच पण स्वतः राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष शीखविरोधी ठरला. आता अरविंद केजरीवाल यांनी तर त्यावर कडी केली. १९८४ च्या दंगलीचे खरे आरोपी कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास गट नेमावा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. राहुल गांधींनी आपल्या या मुलाखतीत या विषयावर चर्चा केलीच नसती तर हे सारे शुक्लकाष्ठ त्यांच्यामागे लागलेच नसते. त्यांनी स्वतः निर्माण केलेली त्यांची ही अडचण अधिकच वाढवत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनीही आपले पवित्रे बदलले हे दोन्ही पक्ष कॉंग्रेसचे मित्रपक्ष आहेत. महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यात त्यांच्या आघाडीची सरकारे आहेत. त्यामुळे या दोन पक्षांनी आपला पवित्रा बदलून कॉंग्रेसला अडचणीत आणले आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदी यांना न्यायालयाचा निकाल येईपर्यंत दंगेखोर म्हणता येणार नाही अशी भूमिका घेऊन राहुल गांधींना हादरा दिला.

Leave a Comment