स्नोडेनची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस

अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या हेरगिरी संदर्भातल्या कारवाया जगासमोर आणणारा एडवर्ड स्नोडेन याला यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जावा अशी शिफारस नॉर्वेचे माजी मंत्री बार्ड वेगर आणि सोल्जेल या दोघांनी नोबेल कमिटीकडे पत्राद्वारे केली आहे. नॉर्वेतील या नोबेल फौंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांसाठी नोबेल पुरस्कार दिले जातात.

सोल्जेल आणि वेगर हे दोघे सोशालिस्ट लेफ्ट पार्टीचे माजी मंत्री आहेत. कमिटीला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, अमेरिकेकडून दुसर्‍या देशांवर व संबंधित देशांचे नेतेच नव्हे तर नागरिकांवरही केल्या जात असलेल्या हेरगिरीची अत्युच्च पातळी स्नोडेनमुळे जगाला समजू शकली आहे. यामुळे सर्व जगात शांततेसाठी प्राथमिक मूलभूत गरज असलेल्या गोष्टीवरील चर्चेला चालना मिळाली आहे आणि ही गोष्ट म्हणजे सरकारवरील विश्वास ही आहे.

या पत्रात ते असेही म्हणतात की स्नोडेनने उघड केलेल्या सर्व माहितीसाठी आम्ही त्याला समर्थन देत नाही मात्र तंत्रज्ञान शक्तीची आधुनिक हेरगिरीत वापरली जाणारी पद्धत उघड केल्याबद्दल त्याचे कौतुक केलेच पाहिजे. त्यामुळे त्याला यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जावा.