राज्यसभेत सर्वाधिक श्रीमंत खासदार भाजपचा

दिल्ली – पुढील महिन्यात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकांत बिहारमधून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळालेले उद्योगपती रविंद्र किशोर सिन्हा हे सर्वाधिक श्रीमंत खासदार असतील असे समजते. निवडणुकीसाठी भरलेल्या अर्जात त्यांनी त्यांची संपत्ती ८०० कोटी रूपयांची असल्याचा उल्लेख केला आहे. दिल्लीच्या विधासनभा निवडणुकांत त्यांनी काम केले असून दिल्ली निवडणूक प्रमुख नितीन गडकरी यांचे ते निकटवर्ती मानले जातात.

सिन्हा हे सिक्युरिटी अॅन्ड इंटेलिजन्स सेवा कंपनीचे मालक आहेत. त्याची ही कंपनी भारत आणि ऑस्ट्रेलियात कार्यरत असून तिची वार्षिक उलाढाल ३ हजार कोटींची आहे. या कंपनीत ७८ हजार लोक काम करतात. सिन्हा यांची जीवनशैली अतिशय साधी आहे आणि बिहारमध्ये तसेच दिल्लीत त्यांच्या मालकीचे बंगले आहेत. महिन्द्र स्कॉर्पिओ ही बुलेटप्रूफ गाडी कांही अन्य गाड्यांसह ते वापरतात.

सिन्हा सांगतात मी अर्जात दिलेली माहिती अत्यंत खरी आहे आणि मला त्याची काळजी वाटत नाही कारण मी सर्व कर वेळेवर भरतो. अर्जात खोटी माहिती देण्याची मला गरज वाटत नाही. १९७० साली त्यांनी पत्रकार म्हणून आपली करियर सुरू केली मात्र त्यानंतर केवळ २५० रूपये भांडवलावर त्यांनी व्यवसाय सुरू केला. पूर्वीचे साधे सरळ जीवन विसरलेलो नाही असे सांगतानाच ते म्हणतात राज्यसभेत निवडून गेलो तर मी पत्रकारांचे प्रश्न प्रामुख्याने मांडणार आहे.

Leave a Comment