ग्राहकांच्या मनातील गुपित अ‍ॅमेझॉन ओळखणार

नवी दिल्ली – ग्राहकांच्या सेवेसाठी आणि त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी जगातील सर्वच कंपन्या धडपडत आहेत. सध्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात ई-कॉमर्स उद्योग जगात वाढत आहे. सध्या इंटरनेटवर खरेदी केल्यानंतर ती वस्तू तीन ते चार दिवसांनी घरी पाठवली जाते. ई-कॉमर्स क्षेत्रातील बडी कंपनी अ‍ॅमेझॉनने ग्राहक सेवेचा चेहरा मोहरा बदलणारी योजना आणली आहे.

ग्राहकांच्या मनात कोणती वस्तू खरेदी करायची आहे हे ओळखून ती मागणी तत्काळ पूर्ण करण्यासाठी अ‍ॅमेझॉनने ही योजना तयार केली. ग्राहकाने ऑर्डर देण्यापूर्वीच त्याचा माल तयार ठेवण्याची जगावेगळी योजना अ‍ॅमेझॉनने तयार केली. या जगावेगळ्या संकल्पनेच्या पेटंटसाठी अ‍ॅमेझॉन कंपनीने अर्ज केला आहे. या तंत्रज्ञानाला कंपनीने अ‍ॅँटीसेपटरी शिपिंग असे नाव दिले आहे.

ऑनलाइन खरेदी सध्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय बनली आहे. नेहमीच्या दरांपेक्षा इंटरनेटवरून खरेदी केलेली वस्तू स्वस्त मिळत असते. मात्र हे सर्व व्यवहार करताना ग्राहकांना अनेक अडचणी भेडसावत असतात. त्या भेडसावू नये म्हणून कंपनीने ही योजना तयार केली. ग्राहकाने ऑनलाइन खरेदी केल्यास त्याला तत्काळ वस्तू मिळत नाही. वस्तूच्या वाहतुकीत तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत असतो. ग्राहकांना वस्तूसाठी वेळ घालवावा लागतो.

त्यामुळे अ‍ॅमेझॉनने ही नवीन योजना आणली. ग्राहकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखणार असा प्रश्न सर्वाना पडलेला असेल. मात्र कंपनीने ग्राहकांनी केलेल्या यापूर्वीच्या खरेदीचा तपशील, ब्रॅँड, मोजलेली किंमत, ग्राहकांनी इंटरनेटवर पाहिलेल्या वस्तू आदींचा अभ्यास केला. त्यानंतर संबंधित ग्राहक कोणती ऑर्डर देऊ शकेल याचा अंदाज कंपनीने बांधला. त्यानंतर ही अभिनव योजना आकारास आली, असे वृत्त द टाइम्सने दिले आहे.

ग्राहकांच्या यापूर्वीच्या खरेदीचा इतिहास पडताळून कंपनी संबंधित वस्तू स्थानिक शहरातील गोदामात पाठवते. त्यामुळे ग्राहकाने वस्तूवर क्लिक केल्यानंतर त्याला तत्काळ ती पाठवण्यात येते. या सर्व प्रक्रियेला अवघ्या काही मिनिटांचा कालावधी लागतो, असे कंपनीने सांगितले. ही योजना अभिनव असली तरी त्यातही काही अडथळे आहेत. ग्राहकाने मागणी नोंदवल्यावरही ती वस्तू उपलब्ध असल्यास त्याला मिळू शकेल. वाहतुकीतील अडथळे गृहित धरून वस्तू मिळण्यास विलंब होऊ शकतो, असे अ‍ॅमेझॉन कंपनीने तिच्या पेटंट कागदपत्रात नमूद केले. ग्राहकांना वस्तू वितरीत करताना ती कमीत कमी वेळेत मिळावी असा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीने वस्तू वितरीत करण्यासाठी ड्रोन विमानांचा वापर करण्याचाही प्रयोग केला. यामुळे ग्राहकांना कोणतीही वस्तू अवघ्या अर्ध्या तासात मिळू शकेल.

Leave a Comment