एडस्वर औषध

मानवाने वैद्यकीय उपचाराच्या क्षेत्रामध्ये सतत नवनवे संशोधन केलेले आहे आणि बरीच नवी औषधे शोधून काढलेली आहेत. परंतु एवढे करून सुद्धा त्याच्या समोर नवनवी आव्हाने उभी रहात आहेत. अजून कर्करोगावर औषध सापडलेले नाही, कित्येक रोगांवर लसी सापडलेल्या नाहीत आणि मानवतेसमोर एक मोठा धोका म्हणून उभ्या असलेल्या एडस्वर औषध सापडलेले नाही. नाना प्रकारे प्रयोग करून हे औषध शोधले जात आहे, परंंतु अजून तरी त्यात १०० टक्के यश आलेले नाही. मात्र जनुकशास्त्राचा आधार घेऊन काही संशोधन केले तर असा उपाय सापडण्याची शक्यता आता दिसायला लागली आहे. मात्र असे उपाय शोधताना औषध आणि उपाय या दोन्हींच्या बाबतीतल्या आपल्या प्रचलित कल्पना बाजूला ठेवाव्या लागणार आहेत. साधारणपणे आपण असे मानून चालतो की, एखाद्या रोगावरचा इलाज म्हणजे तो रोग झालेल्या माणसावर केला जाणारा इलाज आणि वर्षानुवर्षे आपण त्याच दृष्टीने औषधाचा शोध लावत आहोत. परंतु जनुकशास्त्राने या कल्पना बदलून टाकल्या आहेत.

एडस् हा काही रोग नाही. ते अनेक रोगांचे लक्षण आहे आणि एडस् होणे म्हणजे रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी होणे हे सगळे आपल्याला माहीत झाले आहे. एच.आय.व्ही. नावाचा विषाणू हा विकार पसरवतो. एच.आय.व्ही.ला इंग्रजीमध्ये इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस असे म्हणतात. आता काही शास्त्रज्ञांनी या एच.आय.व्ही. व्हायरसवरच इलाज सुरू केले आहेत. या व्हायरसच्या शरीरामध्ये निरनिराळे डीएनए आणि आरएनए असून त्यातील प्रथिनांमुळे हा व्हायरस एडस्चा प्रसार करणारे माध्यम ठरत आहे. त्याच्या शरीरातल्या एडस्चा प्रसार करणार्‍या या प्रथिनाचे स्वरूपच बदलून टाकले तर तो एडस्चा प्रसारच करणार नाही, अशी युक्ती योजून ऑस्ट्रेलियातल्या क्विन्सलँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेतल्या डॉक्टर डेव्हीड हॅरिच या जैव अनुवंश शास्त्रज्ञाने एच.आय.व्ही.चा डीएनए बदलण्याचे काम हाती घेतले आणि या प्रथिनामध्ये असे काही बदल केले की, त्यामुळे ते प्रथिन एडस्चा प्रसार करण्याऐवजी एडस्चा प्रतिकार करायला लागले.

म्हणजेच आता एखाद्याच्या शरीरामध्ये असा जैविक बदल केलेला एच.आय.व्ही. व्हायरस टोचला तर हा एच.आय.व्ही. कर्करोगाला प्रतिबंध करायला लागतो. अशा रितीने माध्यम म्हणून काम करणार्‍या एच.आय.व्ही. व्हायरसमध्येच बदल घडवून डॉक्टर डेव्हीड हॅरिच यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने एडस्चा उपाय शोधून काढला आहे. प्राथमिक स्तरावर विचार केला असता हा उपाय म्हणजे एच.आय.व्ही.वर केला जाणारा उपाय आहे. म्हणजे त्यातून एच.आय.व्ही. व्हायरसमध्ये बदल घडवला आहे. परंंतु शेवटी हा व्हायरस एडस्चा प्रसार करत असल्यामुळे तो परिणामी एडस् वरचा उपाय ठरला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये एडस्चा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे. या देशामध्ये स्थलांतरित लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेही असेल परंतु केवळ दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात ३० हजार एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही बाब मोठी गंभीर आहे. म्हणून ऑस्ट्रेलियातले संशोधक नाना तर्‍हेचे प्रयोग करून एडस् प्रतिबंधक उपाय शोधायला लागले आहेत. त्यातून हा उपाय त्यांना सापडला आहे.