मनसेवर उद्धव यांचे टीकास्त्र

मुंबई – ‘निवडणुकांची चाहूल लागल्याने झोपी गेलेले पक्ष जागे झाले आहेत. रात्रीच्या काळाखोत टोलनाके फोडून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. मात्र एक दिवसाचं नाटक फार काळ चालत नाही’, अशा शेलक्या शब्दात शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या आंदोलनाचा समाचार घेतला.

टोलवरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. शिवसेना-भाजपने टोलमुक्तीचा नारा देत आंदोलन सुरू केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेनेही स्वतंत्रपणे ‘टोल’फोड सुरू केली आहे. या कुरघोडीच्या राजकारणावर चौफेर टीका होत असताना ‘महाराष्ट्राला आम्हीच टोलमुक्त करू’ असा पण करत उद्धव यांनी मनसेवर हल्ला चढवला आहे.

उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘राजकारणात हवशे, नवशे आणि पावशेही आहेत’, असा टोला हाणत मनसेचा समाचार घेतला आहे. ‘पाऊस येण्याची चाहूल जशी पावशा पक्षी देतो तशी निवडणुकांची चाहूल लागताच काही राजकीय पक्ष मर्दानगीचा आव आणतात.

मुंबईत एखादी टॅक्सी फोडून ‘परप्रांतीय हटाव’चा आवाज आला किंवा ‘टोलनाका’तोडीची दोनेक प्रकरणे झाली म्हणजे समजावे आता झोपी गेलेले जागे झाले आहेत’, अशी खिल्ली उद्धव यांनी उडवली.

महायुतीच्या टोलमुक्ती आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाची पोटदुखी झाल्यानेच टोलनाक्यांवर दगडफेकीचे ढोंग करण्यात आले, असे नमूद करताना तुम्ही टोलनाक्यांवर बसवलेले खासगी ऑडिटर्स कुठे गायब झाले?, असा सवालही उद्धव यांनी मनसेचा नामोल्लेख टाळून केला आहे.

Leave a Comment