डेंगी सर्वात व्यापक आजार

१९३० आणि ४० च्या दशकामध्ये जगभरात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली होती. मलेरियामुळे हजारो लोक मरत होते आणि त्यावर काय उपाय योजावा याबाबत संशोधक त्रस्त झालेले होते. एकंदरीत ती दोन दशके मलेरियाग्रस्त दशके होती. डासांपासून पसरणार्‍या या रोगांमुळे सारी मानवजात भयभीत झाली होती. आपल्याला एखाद्या माणसाची निर्भत्सना करायची असेल तर आपण त्याला उपहासाने मच्छर म्हणतो. पण हा मच्छर किरकोळ नसून माणसाची झोप उडवणारा ठरला आहे. मलेरियाची साथ आटोक्यात आली, परंतु त्यावर योजिली जाणारी औषधे निष्प्रभ ठरल्यामुळे त्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. असे असले तरी सध्या डासांमुळे पसरणारा डेंगी हा विकार सर्वाधिक व्यापक असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे. डेंगी या आजाराचा प्रसार सुद्धा सर्वाधिक वेगाने होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. डेंगी हा विकार डासाच्या मादीपासून पसरतो. त्याच्या प्रसाराची काही कारणे शास्त्रज्ञ सांगत आहेत. त्यात सर्वाधिक मोठे कारण आहे मानवी जातीतले वेगान घडत असलेले स्थलांतर.

सध्या माणूस पोटापाण्यासाठी आणि कर्तबगारी दाखविण्यासाठी आपले गाव सोडून दुसर्‍या गावात आणि दुसर्‍या देशात मोठ्या प्रमाणावर जायला लागला आहे. हा स्थलांतर करणारा माणूस आपल्या सोबत रोगजंतूसुद्धा घेऊन जातो आणि त्यातून डेंगीसारख्या आजाराचा प्रसार होतो. हा स्थलांतर करणारा माणूस आपल्या सोबत काही वस्तू घेऊन जातो, त्या वस्तूतूनही रोग जंतूंचा प्रसार होत असतो. एका गावातून दुसर्‍या गावात जाणार्‍या माणसाने आपल्यासोबतच्या घरगुती सामानात एखादा वापरलेल्या टायरचा तुकडा नेला तर त्यातून सुद्धा डेंगीचे जंतू पसरतात. काही लोक शोभेसाठी बांबूची झाडे लावतात आणि त्यांच्या वाहतुकीतून सुद्धा हे जंतू एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जातात. हवामानात होणारे काही बदल आणि पुरासारख्या काही नैसर्गिक आपत्ती यातूनही या जंतूंच्या प्रसाराला मोठी गती मिळत असते, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

डेंगी हा विकार १९५० साली जगातल्या काही मोजक्याच देशामध्ये अगदी अल्प स्वरूपात दिसून आला होता. परंतु आता तो १२५ देशांमध्ये पसरला आहे आणि १९३० तसेच १९४० च्या दशकामध्ये झालेल्या मलेरियाच्या प्रसारापेक्षा डेंगीचा हा प्रसार अधिक वेगवान आणि गंभीर आहे. डेंगीच्या विरोधामध्ये एक लस शोधण्यात आलेली आहे आणि तिचा वापरही केला जातो. परंतु ही लस ३० टक्के एवढीच प्रभावी आहे. म्हणजे डेंगी होऊ नये म्हणून काही करता येत नाही आणि डेंगी झाल्यानंतरही काही करता येत नाही. अशा स्थितीमुळे २०१२ साली डेंगीने सर्वाधिक वेगाने पसरणारा आजार हे स्थान पटकावले आहे. खरे म्हणजे डेंगीची काही साथ नसते. परंतु हा विकार एवढा पसरला आहे की, त्याला साथीचे स्वरूप आले आहे. डेंगीने मरणार्‍यांंची संख्या तशी अल्पच असते, असे म्हटले जाते खरे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने त्याचीही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

१९५० सालपेक्षा २०१२ साली डेंगीने ३० पट अधिक लोक मरण पावले आहेत. १९२० साली डेंगी हा रोग पहिल्यांदा दिसून आला. पोर्तुगालच्या मदिरा या बेटावर पहिल्यांदा हा आजार दिसून आला. तिथे दोन हजार लोकांना तो झाला होता. परंतु आता आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील जवळपास १०० देशांमध्ये दरसाल २० लाख लोकांना डेंगी होत आहे आणि गतवर्षी या आजाराने मरणार्‍यांची संख्या पाच ते सहा हजार एवढी झालेली आहे. आता कोणताही खंड डेंगीपासून मुक्त राहिलेला नाही. काही लोकांनी गेल्या ५० वर्षात केलेल्या पाहणीमध्ये आजवर १० कोटी लोकांना डेंगी झाला असल्याचे म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment