लज्जतदार पिझ्झा बनविणारा थ्री डी प्रिंटर तयार

अंतराळात असताना अंतराळवीरांना ताजा, गरमागरम व लज्जतदार पिझ्झा बनवून देऊ शकणारा थ्रीडी प्रिंटर भारतीय वंशाच्या इंजिनिअरने तयार केला आहे. अन्जान कॉन्टॅक्टर नावाच्या या इंजिनिअरने असा प्रिंटर बनविण्यासाठी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन केंद्राकडून १२,५०० डॉलर्सचे अनुदान मिळविले होते टेक्सास येथील सिस्टीम ऑफ मटेरियल रिसर्च कार्परेशन मध्ये अन्जान काम करतो.

अंतराळवीरांना अंतराळात असताना हवाबंद डब्यातील अन्न, तसेच सुकामेवा अथवा सुके खाद्यपदार्थच आजपर्यंत खाता येत होते. त्याऐवजी त्यांना पौष्टीक आणि ताजे खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यातूनच हा प्रिंटर बनविला गेला आहे. हा प्रिंटर पदार्थातील प्रोटीन्स, फॅट आणि अन्य पोषक मूल्ये कायम राखून केवळ ७० सेकंदात पिझ्झा तयार करू शकतो तसेच अन्य जेवणही बनवू शकतो.