अन्न प्रक्रियेतच समृध्दी

आपण बाजारातल्या कोणत्याही खाद्य वस्तूची खरेदी करताना त्या वस्तूची किंमत आणि ती तयार करण्यासाठी वापरलेल्या कच्च्या शेतीमालाची किंमत यांची तुलना करून बघावी तेव्हा आपल्याला आढळेल की एक रुपयाच्या शेतीमालावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेली खाद्यवस्तू दहा रुपयाला विकली जात असते. उसाचा दर दोन रुपये किलो एवढा आहे. पण याच उसाचा रस काढल्यास काढल्यानंतर मात्र तोच रस तीस रुपये किलो दराने विकला जातो. त्यामुळे शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग शेतकर्‍यांनी काढले पाहिजेत तरच शेतकरी समृध्द होणार आहे. शेतीच्या अर्थव्यवस्थेचे एक तत्त्व आहे की, कच्चा माल विकणारा दरिद्री राहतो आणि त्याच कच्च्या मालावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेला माल विकणारा मात्र श्रीमंत होतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दापोली येथे बोलताना काजू आणि आंब्याच्या प्रक्रियेवर संशोधन करण्यासाठी सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला असल्याचे जाहीर केले. शेतकर्‍यांची शेती फायद्यात चालावी यासाठी करावयाच्या उपायांच्या बाबतीत महाराष्ट्राचे सरकार आता जागे झाले आहे. हे त्यांच्या घोषणेवरून लक्षात येते. उशिरा का होईना पण महाराष्ट्र सरकारला समृध्दीचा मार्ग सापडला आहे असे म्हणावेसे वाटते.

डॉ.अब्दुल कलाम यांच्या व्हिजन २०२० या प्रबंधात महाराष्ट्राची फळे पिकवण्याची क्षमता अफाट असल्याचे म्हटले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा या चार राज्यात फळे आणि भाजीपाला पिकवण्याची अफाट क्षमता आहे. या पिकांसाठी या राज्यातली नैसर्गिक स्थितीसुध्दा अनुकूल आहे. त्यामुळे या चार राज्यातल्या शेतकर्‍यांनी भाजीपाला आणि फळांवर भर दिला पाहिजे. असे या प्रबंधात म्हटले होते. परंतु या पिकांवर या भागामध्ये फार लक्ष दिले गेले नाही. महाराष्ट्रात मात्र १९९१ सालपासून फळबागायतीला चांगली चालना मिळाली आहे. त्यामुळे नाशिक, सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील द्राक्षे, कोकण आणि मराठवाड्यातले आंबे, जळगाव आणि नांदेड जिल्ह्यातील केळी, नागपूरची संत्री, जालन्याची मोसंबी, कोकणातील नारळ, सोलापूर जिल्ह्यातील बोर, डाळींब, नगर जिल्ह्यातील पेरू आणि चिक्कू यांनी अक्षरशः जगाच्या बाजारपेठा काबीज करायला सुरूवात केली आहे. काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबा आणि काजू यांचे मार्केटिंग चांगले करता यावे यासाठी प्रक्रिया उद्योगाला चालना देणार असल्याचे जाहीर केले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली येथे झालेल्या या कार्यक्रमात आंबा आणि काजूच्या प्रक्रियेसाठी शासनाने शंभर कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. हे एक स्वागतार्ह पाऊल आहे.

कारण भारतामध्ये शेतकरी आपल्या शेतातली फळे तशीच बाजारात नेऊन विकत असतात. त्यामुळे त्यांना त्याची किंमत कमी मिळते. मात्र याच फळांवर निरनिराळ्या प्रक्रिया केल्या तर त्या फळांची किंमत कैक पटींनी वाढते. सध्या जगाच्या बाजारात भारतातली आणि विशेषतः महाराष्ट्रातली फळे मोठ्या प्रमाणावर विकली जातात आणि त्याचे आपल्याला कौतुक वाटते. महाराष्ट्रातला शेतकरी आजवर जगाच्या बाजारात गेलाच नव्हता त्यामुळे तो फळे विकण्यासाठी का होईना गेला आहे. याचेच आपल्याला कौतुक वाटते. मात्र जगातली आघाडीची फळे उत्पादक राष्ट्र आपल्या देशातील फळे बाजारात विकत नाहीत. ब्राझील, इस्त्रायल, अमेरिका या देशातील फलोत्पादक आपली फळे बाजारात नेऊन विकण्यापेक्षा कारखान्यात नेऊन विकतात आणि फळांवर कसली ना कसली प्रक्रिया करून मगच प्रक्रियायुक्त पदार्थ विकले जातात. या प्रक्रियेतून शेतकर्‍यांना फळांची चांगली किंमत मिळते आणि देशाला परकीय चलन मिळते. ब्राझीलमध्ये उत्पादित होणार्‍या फळांपैकी ९० टक्के फळे प्रक्रियेसाठी बाजारात नेली जातात आणि केवळ १० टक्के फळे ताज्या स्वरूपात थेट बाजारात नेऊन विकली जातात. भारतात मात्र परिस्थिती उलटी आहे.

भारतातल्या १० टक्के फळांवरसुध्दा प्रक्रिया होत नाही. म्हणजे आपण फळांच्या प्रक्रियेमधून मिळणार्‍या जादा उत्पन्नाला मुकत असतो. जी फळे जेमतेम १० रुपयांना विकली जातात त्यांचाच रस काढून तो चांगली पॅकिंग करून विकला तर त्याचे शंभर रुपये मिळतात. मात्र आपण १० रुपयांची फळे विकून मोकळे होतो. म्हणजे आपण ९० रुपयांच्या उत्पन्नाला मुकतो. हीच गोष्ट सगळ्या फळांना आणि भाज्यांना लागू आहे. काही काही भाज्यांवर प्रक्रिया करून त्या कच्च्या भाज्यांपेक्षा कितीतरी जास्त किंमतीला विकल्या जात असतात. साध्या टोमॅटोचा सॉस उदाहरणादाखल आपण बघू शकतो. जे टमाटे पाच रुपयांना विकले जातात त्यांचा सॉस सरळ सरळ वीस रुपयांना विकला जातो. मात्र आपण टमाटे विकले जात असल्याच्या आनंदात प्रक्रियेच्या किंमतीकडे दुर्लक्ष करतो. महाराष्ट्रात सध्या उसापासून साखर बनविली जाते. कापसापासून सूत बनविले जाते आणि द्राक्षांपासून मनुका बनवल्या जातात. त्यापासून मिळणारे उत्पन्न चांगले असते याचा अनुभव आपल्याला आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्षापासून मद्य निर्मिती केली जाते. तशीच मद्य निर्मिती बोर, सीताफळ, संत्री, मोसंबी, डाळींब यापासूनसुध्दा बनवता येते आणि त्यांना चांगली मागणीसुध्दा आहे. राज्य सरकारच्या डोक्यात आता. प्रक्रिया उद्योगाची कल्पना आली आहे ही गोष्ट कौतुकाचीच म्हणावी लागेल. मात्र प्रक्रिया उद्योगाचे क्षेत्र एवढे व्यापक आहे आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न एवढे अफाट आहे की आपण प्रक्रिया उद्योगाची कास धरली तर महाराष्ट्र संपन्न होऊ शकतो.

Leave a Comment