रेपो दरात वाढ; गृहकर्ज महागणार

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने आज (मंगळवार) आपले पतधोरण जाहीर करताना रेपो दरामध्ये 25 गुणांची वाढ केली. यामुळे आता रेपो दर 8% इतका झाला आहे. त्याचबरोबर रोख राखीव गुणोत्तरामध्ये (सीआरआर) रिझर्व्ह बँकेने कोणताही बदल केलेला नाही. यामुळे सीआरआर 4 टक्केच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा फटका गृहकर्जांना बसण्याची दाट शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेचा रेपो दरात आणखी वाढ करण्याचा हा निर्णय आश्‍चर्यकारक असल्याचे मानले जात आहे. “रेपो दरात केलेल्या वाढीमुळे महागाई कमी होण्याच्या प्रक्रियेस मदत होईल,” असे रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर रेपो दरात आता यापुढे शक्‍यतो वाढ केली जाणार नाही, असे संकेतही रिझर्व्ह बँकेने यावेळी दिले.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासमोर सुमारे पाच टक्‍क्‍यांच्या मंदगतीने चालणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग वाढविण्याचे मुख्य आव्हान असल्याचे मानले जात आहे. रेपो दरामध्ये आणखी वाढ केली जाणार नाही, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला होता. मात्र, या अंदाजाविरोधात रेपो दरात वाढ करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

चालु वित्तीय वर्षामध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा पाच टक्‍क्‍यांखाली राहिल; मात्र पुढील वर्षात या वेगामध्ये वृद्धी होऊन तो साडेपाच टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेने बाळगले आहे.

Leave a Comment