मुलाखतीचा पश्‍चात्ताप

राहुल गांधी यांनी राहून राहून एका इंग्रजी दैनिकाला एक प्रदीर्घ मुलाखत दिली. तिच्यातून त्यांची प्रतिमा चांगली तयार होईल अशी कल्पना होती. पण या मुलाखतीनंतर कॉंग्रेसच्याच नेत्यांना ही मुलाखत झाली नसती तर बरे झाले असते असे वाटायला लागले आहे. इतकी ती फसली आहे. प्रचंड मोठी मुलाखत द्यायची म्हटल्यावर जी वैचारिक तयारी लागते ती त्यांच्याकडे नाही हे त्यांनी या मुलाखतीतून सिध्द करून दिले. त्यांनी तिच्यात कसलाही सकारात्मक नवा मुद्दा मांडलेला नाही. आजवर विस्कळीत स्वरूपात जी जी विधाने केली त्या सर्वांची गोळाबेरीज करून एका मोठ्या मुलाखतीची वाकळ तयार केली आहे. वाकळीला तयार करण्यासाठी टाकून दिलेले निरुपयोगी कपडे वापरले जातात. तशीच अवस्था याही वाकळीची झाली आहे. राहुल गांधी जे जे काही बोलतात ते अतीशय पोचटपणाचे, कसलीही वैचारिक चमक नसलेले, कल्पकतेचा अभाव असलेले आणि निरस असते. मात्र आपले हे निरर्थक बोलणे आपण मोठ्या आवाजात बोलायला लागलो किंवा ती वाक्ये बोलताना चिरकायला लागलो, नाकपुड्या फुगवायला लागलो की मग आपण नरेंद्र मोदी एवढे आक्रमक दिसायला लागू अशी त्यांची बालीश कल्पना आहे. परंतु कोणत्याही विचारातला आक्रमकपणा हा त्याच्या आशयात असला पाहिजे. केवळ आवाजाने आक्रमकपणा सिध्द होत नसतो. त्यांच्या मुलाखतीतल्या प्रत्येक मुद्याचे उदाहरण त्यांचा हा अपरिपक्वपणा सिध्द करण्यास पुरेसे आहे.

राहुल गांधी कॉंग्रेसमधली व्यवस्था बदलायला निघाले आहेत आणि बर्‍याच दिवसांपासून ते ही गोष्ट इतक्या मोठ्या आविर्भावात सांगत आहेत की जणू कॉंग्रेसमधली व्यवस्था बदलली की देश बदलून जाणार आहे. खरे म्हणजे त्यांच्या कॉंग्रेसमधली व्यवस्था ही त्यांच्या संघटनेतली व्यवस्था आहे. ती बदलायला कोणी विरोध केला नाही आणि आता राहुल गांधी म्हणतात, ‘‘माझा प्राण कोणी घेतला तरी हरकत नाही पण ही व्यवस्था बदलणार.’’ आता त्यांनी कॉंग्रेसमधली बदलली नाही तर त्यांचा प्राण कोणीतरी घेण्याचा काही मुद्दाच येत नाही. पण उगाचच आक्रमकपणा दाखवण्यासाठी ते त्या मुद्याच्या मागे आपला प्राण पणाला लावायला लागले आहेत. गंमतीचा भाग म्हणजे ते गेल्या पाच वर्षापासून कॉंग्रेसमधल्या व्यवस्था बदलण्याच्या गोष्टी करत आहेत. कोणताही निर्णय घेताना सामान्य कार्यकर्त्याला विचारात घेणार, सामान्य कार्यकर्त्याला मोठे करणार, तरुणांना पुढे आणणार अशी बाष्कळ बडबड ते करत आहेत पण ज्या ज्या वेळी त्यांनी ही बडबड केली त्या त्या वेळी त्यांनी पक्षातल्या मक्तेदारांनाच पुढे केले आहे. मागे एकदा त्यांनी तरुणांना सरकारमध्ये आणणार असे म्हटले आणि त्याचवेळी मंत्रिमंडळात फेरबदल केले.

त्यांच्या त्या फेरबदलात त्यांनी सीसराम ओला यांना समाविष्ट केले होते. ते एवढे वृध्द होते की चार पाच महिन्यातच वृध्दत्वामुळे मरण पावले. या फेरबदलात मंत्रिमंडळात घेतलेल्या मंत्र्यांचे सरासरी वय ७८ वर्षे होते आणि त्याचवेळी राहुल गांधी तरुणांच्या हाती सत्ता देण्याच्या गोष्टी बोलत होते. कथनी आणि करणी यात फरक असणे हा कॉंग्रेसचा धर्मच आहे. तो राहुल गांधी इमाने इतबारे पाळत आहेत. आतासुध्दा सामान्य कार्यकर्त्याला पुढे आणण्याच्या गोष्टी बोलतानाच त्यांच्या पक्षाने मुरली देवरा यांन राज्यसभेचे तिकिट दिले. मुरली देवरा यांचा मुलगा मिलिंद देवरा केंद्रीय मंत्रिमंडळात आहे. त्याच्याच वडिलांना राज्यसभेवर घेत असताना राहुल गांधी नाकपुड्या फुगवून चिरक्या आवाजात, सामान्य कार्यकर्त्याचा आवाज मोठा करीन, जीव गेला तरी बेहत्तर असे कितीही म्हणत असले तरी त्यातला ढोंगीपणा, खोटारडेपणा लपल्याशिवाय राहत नाही. राहुल गांधींची ही प्रदीर्घ मुलाखत हा ढोंगीपणाचा नमुनाच आहे. लोकांना ज्या गोष्टी पटलेल्या नाहीत त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत आहेत. आपल्याला घराणेशाहीचा उबग आला आहे असे ते म्हणत आहेत पण असे म्हणताना पक्षातले एकही पद सोडण्याची त्यांची तयारी नाही.

भारतीय जनता पार्टी एकाच व्यक्तीच्या हातात सत्ता देणार आहे असे ते वारंवार सांगत आले आहेत. पण भारतीय जनता पार्टीने कधीही सारी सत्ता नरेंद्र मोदी यांच्या हातात राहील असे म्हटलेले नाही. पण हा शोध राहुल गांधींनी कोठून लावला आहे हे कळत नाही. गुजरात दंगल आणि दिल्लीतील शीखांची हत्याकांड यावर बरीच चर्चा होऊन गेलेली आहे. गुजरात दंगलीत भाजपाचे नेते सहभागी होते ही गोष्ट खरी आहे. पण तिच्या संबंधात कॉंगे्रसचे नेते नरेंद्र मोदीवर जो थेट आरोप करत आहेत तो आरोप कायद्याच्या कोणत्याही प्रक्रियेत सिध्द झालेली नाही. उलट दिल्लीतल्या शीखांच्या हत्याकांडामागे राजीव गांधींची फूस होती ही गोष्ट अनेकदा दिसून आली आहे आणि या हत्याकांडाबद्दल सोनिया गांधींनी शीखांची माफी मागून, हे हत्याकांड आपण केले होते हे मान्य केले आहे. अर्थात, या घडलेल्या गोष्टींची चर्चा अंतहीन आहे. राहुल गांधी देशाचा विकास कसा करणार आहेत याची चर्चा ते करत नाहीत त्यांच्या डोळ्यासमोर देशाच्या विकासाची कोणती ब्ल्यू प्रिंटआहे याची एका वाक्यानेही ते चर्चा करत नाहीत. महागाईवर बोलत नाहीत, गरिबांच्या मुलांना शिक्षण महाग झाले आहे यावर चकार शब्द बोलत नाहीत.

Leave a Comment