नवी गुन्हेगारी

आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारी अनेक प्रकारची गुन्हेगारी आपण पहात आलो आहोत. मादक द्रव्यांची संघटित गुन्हेगारी आपल्याला ज्ञात आहे. मुलींना पळवून नेऊन शरीरविक्रयाला लावणारांची षड्यंत्रे आपण जाणून आहोत. पण दुसर्‍यांची गोपनीय बँक खाती शोधून काढून त्यातली माहिती हवी असणारांना विकणारी म्हणजे हॅकर्सची टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असेल असे कधी वाटले नव्हते. माहिती तंत्रज्ञानाने अनेक सोयी आणल्या आहेत तशाच या तंत्रज्ञानाचा असा गैरवापर करणारांनी अनेक गैरसोयीही आणल्या आहेत. नवनव्या तंत्रज्ञानाची जादू जशी सामान्य माणसाला मोहिनी घालते तशीच ती गुन्हेगारांनाही मोहिनी घालते. त्यांनी सुध्दा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून चोर्‍या करायला सुरूवात केली आहे आणि ही गोष्ट आता जुनीही झाली आहे. परंतु चोरून लोकांचे बँक खाते बघता येते म्हणजेच कोणाचेही बँक खाते आणि त्या खात्यातली सारी गोपनीय माहिती हॅक करता येते. ही गोष्ट समजल्यापासून कोणाचेही बँक खाते हॅक करण्याची युक्ती माहीत झालेल्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष अमेरिकेत बसून जगातल्या सर्वांची गोपनीय माहिती वाचू शकतात तसेच काही शार्विलक लोकांच्या बँक खात्यांची माहिती वाचायला लागले आहेत आणि त्यातून बँक खाती हॅकिंग करण्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी अमित तिवारी या तरुणाला लोकांचे बँक खाते हॅक केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली. त्याला एकट्याला जरी अटक केली असली तरी तो दुसर्‍याची खाती हॅकिंग करणार्‍या आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा सदस्य असावा असा संशय आहे. म्हणजे अमित तिवारी हा हिमनगाचा एक छोटा दृश्य तुकडा आहे. कारण त्याला अटक करण्यासाठी अमेरिका, भारत, रुमानिया आणि चीन या चार देशांच्या गुप्तचर यंत्रणा कार्यरत झाल्या होत्या. यूरोप, अमेरिका आणि आशिया अशा तीन खंडातल्या देशात हे जाळे पसरलेले असणार आहे. याचा अर्थ या प्रकरणात अमित तिवारी हा एकटा नाही आणि जगभरामध्ये लोकांची खाती हॅक करणार्‍यांचे मोठे षडयंत्र जारी आहे. सीबीआयच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हॅकिंग हा व्यवसाय झाला आहे आणि या व्यवसायात अनेक टोळ्या कार्यरत आहेत. अमित तिवारीला अटक केली तेव्हा तो ६० कोटी डॉलर्सच्या हॅकिंगच्या कारस्थानात सहभागी होता असे दिसून आले. प्रत्येक माणसाला लोकांच्या बँक खात्याला डोकावायला फार आवडते आणि त्यासाठी हॅकिंग करणार्‍या टोळ्यांना काही विशिष्ट व्यक्तींची नावे सांगून त्यांची खाती हॅक करून त्यांच्या बँक खात्याची माहिती िमळवायला सांगितले जाते.

ज्या ज्या व्यवसायामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे आवश्यक असते त्या सर्व व्यवसायांमध्ये त्या हॅकिंग टोळ्या कामाला लागल्या आहेत. भारतात पुणे आणि गाझियाबाद या दोन शहरातील हॅकिंग टोळ्या फार प्रसिध्द आहेत. आर्थिक परिस्थितीविषयीची उत्सुकता लग्न जमवतानासुध्दा असते. एखाद्या मुलीचे लग्न एखाद्या मुलाशी जमते तेव्हा साहजिकच तो मुलगा आपल्या आर्थिक परिस्थितीच्या बढाया मारतो. मुलीच्या वडिलांना त्याच्या बढाया कितपत खर्‍या आहेत हे जाणून घ्यायचे असते. मात्र वधूपिता आपल्या नियोजित जावयाला त्याचे बँकचे पासबुक तर मागू शकत नाही अशा वेळी तो हॅकिंग करणार्‍या टोळीला कंत्राट देतो आणि आपला नियोजित जावई थापा मारत आहे की काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अशाच प्रकारे काही बिल्डर मंडळी हॅकिंगच्या टोळीचा उपयोग करतात. आपली घरे विकत घेणारी मंडळी कितपत विश्‍वासार्ह आहेत हे त्यांना जाणून घ्यायचे असते आणि त्यासाठी हॅकिंग करणार्‍यांचा उपयोग केला जातो. अशाच रितीने अनेक उद्योग समूहांना, नेत्यांना आणि उद्योगपतींना हॅकिंगची मदत लागत असते. या सगळ्यांची ही गरज विचारात घेतली म्हणजे भारतात अशा सोळा टोळ्या कार्यरत आहेत या माहितीवर विश्‍वास बसतो. आपल्या देशामध्ये काही शहरात डिटेक्टिव यंत्रणा कार्यरत आहेत.

या खाजगी यंत्रणा आपल्या क्लायंटच्या म्हणण्यानुसार कोणावरही नजर ठेवतात आणि त्याच्या हालचालीची बित्तंबातमी क्लायंटला देतात. गुप्तचर यंत्रणांचे हे जसे काम सुरू असते तसेच हॅकिंगच्या टोळ्यांचेही काम जारी असते. सीबीआयच्या अधिकार्‍यांनी अमित तिवारीने दिलेल्या माहितीच्या आधारावर अधिक चौकशी केली असता असेही दिसून आले की क्रिकेटच्या आयपीएल मॅचेस ठरवतानासुध्दा हॅकिंग टोळी वापरली गेली आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणार्‍या एका कंपनीने खेळाडूंच्या लिलावात पाऊल टाकले तेव्हा पुण्याच्या याच हॅकिंग टोळीला त्या सौद्यात सहभागी होत असलेल्या काही गुंतवणूकदारांची खरी आर्थिक परिस्थिती काय आहे याचा छडा लावण्याचे कंत्राट देण्यात आले होते. म्हणजे आपण बघता बघता आपल्या समाजामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा उदय होताच त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याच्या पध्दतीसुध्दा विकसित झाल्या आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भारतातल्या या हॅकिंग टोळीने १३०० लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा छडा लावण्याचे काम मिळवलेले होते. आता मात्र त्यांचा पोलखोल झाला आहे.

Leave a Comment