अॅमेझॉनने विकसित केले माईंड रिडींग तंत्रज्ञान

जगातील बड्या ऑनलाईन रिटेलर्सपैकी एक असलेल्या अॅमेझॉनने माईंड रिडींग तंत्रज्ञान विकसित केले असून त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. अँटिसिपेटरी शिपिंग असे या तंत्रज्ञानाचे नामकरण करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकाला काय हवे आहे आणि कोणत्या वस्तूची खरेदी करायची आहे याची माहिती ग्राहकाने प्रत्यक्ष ऑर्डर देण्यापूर्वीच कंपनीला मिळणार आहे. ऑनलाईन खरेदीचा मुख्य तोटा असा असतो की पैसे दिल्याबरोबर ग्राहकाला वस्तू लगोलग मिळत नाही तर त्यासाठी कांही दिवस अथवा आठवडाभर प्रतीक्षा करावी लागते. अॅमेझॉनने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकाने वस्तूची ऑर्डर देताच कांही मिनिटात अथवा तासांत ती वस्तू ग्राहकाच्या हातात पडणार आहे.

यासाठी ग्राहकाने पूर्वी केलेली खरेदी, तसेच ग्राहक कोणत्या वस्तूंचा सर्च करतोय, एखाद्या वस्तूवरून ग्राहकाचा कर्सर किती वेळा जातोय यासारख्या बाबी पडताळून पाहिल्या जातात. त्यानंतर ग्राहकाला काय खरेदी करायचे असेल याचा अंदाज करून त्या वस्तू ग्राहकाच्या घराजवळ असलेल्या वेअरहाऊसमध्ये अगोदरच पाठविल्या जातात.परिणामी ग्राहकाकडून जेव्हा प्रत्यक्ष मागणी येते तेव्हा अल्पावधीत वस्तू ग्राहकाला मिळू शकते. कंपनीने अर्ध्या तासात ग्राहकाने मागितलेल्या वस्तूची डिलिव्हरी करता यावी यासाठी फ्लाईंग ड्रोन वापरण्याचा प्रयोगही सुरू केला आहे.

Leave a Comment