राज्यसभा बिनविरोध: संजय काकडेंचे संसदेत जाण्याचे स्वप्न पूर्ण

मुंबई- महाराष्ट्रातील सात जागांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली. सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, राजकुमार धूत, रामदास आठवले, हुसेन दलवाई, मुरली देवरा यांच्यासह अपक्ष व उद्योगपती संजय काकडे राज्यसभेत पोहोचणार आहेत.

सातवी पास असलेले पुण्याचे उद्योजक संजय काकडे यांचे संसदेत जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज शेवटच्या दिवशी भाजपच्या कोट्यातून आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी दुपारी 12 च्या सुमारास आपला अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, सात जागांसाठी आलेल्या सातही अर्जाची उद्या छाननी होणार आहे. जेवढ्या जागा आहेत तेवढेच अर्ज आले असल्याने अर्ज माघारी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही निवडणूक प्रक्रियेनुसार शुक्रवारपर्यंत (31 जानेवारी) अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात येईल.

Leave a Comment