पित्याने मांडले गे लेकीचे स्वयंवर

पुराण काळात स्वयंवर रचून राजकन्यांचे विवाह केले जायचे असे नाही तर आजच्या आधुनिक काळातही स्वयंवर होत आहेत हे वाचून कदाचित नवल वाटेल. पण हाँगकाँगमधील एका बड्या उद्योजकाने त्याच्या गे मुलीचे स्वयंवर रचले असून तिचे हृदय जिंकणार्‍या कोणाही पुरूषाला १३० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स म्हणजे ८१५ कोटी रूपये देण्याचे जाहीर केले आहे. सेसिल चाओ या प्रापर्टी डेव्हलपिंगचा व्यवसाय करणार्‍या अतिश्रीमंताने दोन वर्षांपूर्वीही त्याची कन्या गिगि हिच्याशी विवाह करणार्‍याला ६५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स देण्याची तयारी दाखविली होती व त्याच्या या आवाहनाला २० हजार पुरूषांनी प्रतिसाद दिला होता.

आता मात्र त्याने ही ऑफर दुप्पट केली आहे. ७७ वर्षीय सेसिल म्हणतो, गिगिचे हृदय जिंकून जो पुरूष तिला लग्नासाठी तयार करेल त्याला ८१५ कोटी रूपये मिळतील. तिच्या खासगी आयुष्यात मला ढवळाढवळ करायची नाही मात्र कोणत्याही प्रेमळ पित्याप्रमाणेच मला तिचे लग्न व्हावे, तिला मुलेबाळे व्हावीत आणि माझ्या इस्टेटीचा वारसा त्यांच्याकडे जावा असे वाटते.

३३ वर्षीय गिगिने मात्र यापूर्वीच तिच्या मैत्रिणीबरोबर फ्रान्समध्ये जाऊन २०१२ साली गे मॅरेज केले आहे. हाँगकाँगमध्ये अशा लग्नाला परवानगी नाही. गिगी मात्र मैत्रिणीसोबत आनंदात आहे आणि वारसा हक्काने मिळणारा पैसा चॅरिटीसाठी देण्याची तिची इच्छा आहे. फेथ इन लव्ह नावाची चॅरिटी संस्था ती चालविते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment