दिखाऊ उपोषण

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात अराजकवादी सत्ताधारी हा शब्द आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना उद्देशून उच्चारला असला तरी त्याला आपण सुद्धा पात्र आहोत हे खासदार संजय निरुपम यांनी सिद्ध करून दिले आहे. मुंबईचे खासदार असलेले कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले. वीज दर कमी करावेत अशी त्यांची मागणी होती. सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला असे उपोषण करावे लागते. त्यात त्याचा राजकीय फायदा असेलही. परंतु त्यामुळे पक्षाची परिस्थिती काय होते याचा विचार त्यांनी केलाच नाही. कॉंग्रेसचे खासदार उपोषणाला बसतात त्याअर्थी कॉंग्रेस पक्षात त्यांच्याच खासदाराचे म्हणणे कोणी ऐकत नाहीत असा होतो. परंतु निरुपम यांच्यासारख्या उथळ नेत्यांना स्वत:च्या निवडणुकी पलीकडे पक्षाची इभ्रत काहीच वाटत नाही. विरोधी पक्षांना एखादी मागणी सत्ताधार्‍यांकडून मंजूर करून घ्यायची असेल तर त्यासाठी आंदोलन करावे लागते. पण त्या मागणीचे गांभीर्य सत्ताधार्‍यांपर्यंत पोचत नाही. तेव्हा अधिक तीव्र आंदोलन करून विरोधी पक्ष अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण करतात. परंतु आपल्या लोकशाहीत सध्या सत्ताधारी पक्षच अराजक निर्माण करायला लागला आहे.

एखाद्या मागणीसाठी आंदोलन केले, उपोषण केले की, जनता प्रभावित होते आणि मते मिळतात असे सत्ताधारी नेत्यांना वाटायला लागले आहे. त्यातूनच सत्ताधार्‍यांची आंदोलने निर्माण होत आहेत. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनामुळे या चर्चेला गती मिळाली. परंतु आपली स्मरणशक्ती फार क्षीण असते. अशा जुन्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत. गतवर्षी राहुल गांधी यांनी दिल्ली लगत असलेल्या उत्तर प्रदेशाच्या भागांमध्ये असेच आंदोलन केले होते. उत्तर प्रदेशात निवडणुका जवळ आल्यामुळे राहुल गांधींनी तिथल्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्याच्या विरोधात आंदोलन केले होते. आता त्यांचीच पुनरावृत्ती करीत मुंबईतले कॉंग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी वीज दर कमी करण्याच्या मागणीसाठी तीन दिवस उपोषण केले. त्यांचे उपोषण आणि त्या उपोषणाची समाप्ती या गोष्टी पाहिल्या म्हणजे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल केलेल्या भाषणाची आठवण होते. राष्ट्रपतींच्या या भाषणाला उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन करणे हा आपला हक्क आहे आणि तो लोकशाहीशी सुसंगत आहे असे म्हटले.

आंदोलन करणे हा हक्क आहे, पण कोणाचा हक्क आहे? ज्याला आंदोलनाची गरज नाही त्यांना त्या हक्काचा उपयोग काय? ज्यांना लोकांच्या काही मागण्या पुढे करायच्या असतात पण सत्ताधारी पक्षाकडून त्या पूर्ण होत नाहीत त्यांना त्या मागण्यांच्या आग्रहासाठी आंदोलन करावे लागते आणि त्यांनी ते करावेही. पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी एखाद्या पोलीस अधिकार्‍याच्या बदलीसाठी रस्त्यावर उतरावे ही गोष्ट योग्य नाही. अरविंद केजरीवाल हे स्वत:च मुख्यमंत्री आहेत. परंतु त्यांच्या राज्यातील एका पोलीस अधिकार्‍याची बदली करणे त्यांच्या ऐवजी केंंद्राच्या हातात आहे. अशावेळी सत्तेचा वापर करून केंद्राकडे त्यांना ही मागणी रेटता आली असती. पण त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मुंबईचे खासदार संजय निरुपम यांचे आंदोलन तर यापेक्षा अधिक ढोंगीपणाचे आहे. विजेचे दर खूप वाढलेले आहेत, त्यामुळे ते कमी करावेत अशी मागणी त्यांनी केली आणि त्यासाठी ते उपोषणाला बसले. एखादी मागणी मान्य होत नसेल तर त्यासाठी उपोषण करणे सयुक्तीक असते. पण संजय निरुपम यांचे उपोषण तसे नव्हते. जी मागणी मान्य होण्याची शक्यता आहे, किंबहुना ती मान्य होण्याच्या पातळीपर्यंत आलेली आहे तिच्यासाठी उपोषण करून आपल्या उपोषणानेच ती मागणी मान्य झाली असे भासविण्याचा भामटेपणा या आंदोलनामागे होता.

आंदोलन करताना सुद्धा त्याची किती चेष्टा करावी याला काही मर्यादा आहे की नाही? त्यांनी आधी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या घोषणा करणे सोपे पण भूक लागून जीव कासावीस व्हायला लागला की जीव कासावीस होतो. विशेषत: सतत भरपूर खाण्या-पिण्याची सवय असणार्‍या कॉंग्रेसच्या खासदारांना उपोषण अजिबात मानवत नाही. त्यातच निरुपम यांनी अतिरेक करून आमरण उपोषण जाहीर केले. कदाचित त्यांना आणि लोकांनाही आमरण शब्दाचा अर्थ माहीत नसेल. परंतु सगळेच लोक अज्ञानी नाहीत. आमरण उपोषणाचा अर्थ होतो, मागणी मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. ती मान्य झाली नाही आणि उपोषणामुळे जीव गेला तरी हरकत नाही अशी आमरण मागची भूमिका असते. परंतु निरुपम यांना आपण काय करत आहोत याचे भान नसावे. त्यांनी उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी तर अगदी हाईट केली. वीज दर कपातीचे निर्णय न झाल्यास अनिल अंबानी यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करू असा इशारा त्यांनी दिला. आमच्या माहितीप्रमाणे अजून तरी अनिल अंबानी यांनी त्यांना भीक घातलेली नाही. परंतु आणखी एका नव्या माहितीनुसार खासदार निरुपम यांनी अजून तरी आत्मदहन केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी वीज दर कपातीचा निर्णय घेतला जाईल, असे तोंडी आश्‍वासन दिले आणि खासदार निरुपम उपोषण सोडून उठले. खरे म्हणजे असे तोंडी आश्‍वासन पूर्वीच दिलेले होते, मग उपोषण केले कशाला? यालाच राष्ट्रपतींनी सत्ताधारी पक्षाचा सवंग प्रसिद्धीसाठी केलेला गोंधळ असे म्हटले आहे. निवडणुका जवळ आल्या म्हणजे ढोंगी नेत्यांना असा गोंधळ घालावासा वाटतो, कारण चार वर्षे झोपा काढलेल्या असतात.

Leave a Comment