पाण्याच्या बाटल्यापासून सावध

बाटलीतले पाणी पिणे ही आता आपली सवय झाली आहे. पूर्वी अल्युमिनियमच्या वॉटर बॅग्स वापरल्या जात असत आणि त्यांना कॅन्व्हासचे कव्हर घातलेले असे. त्यापूर्वी तर प्रवासाला जाताना पितळेच्या ङ्गिरकीच्या झाकणाच्या तांब्यात पाणी नेण्याची पध्दत होती. आता हे सगळे मागे पडले आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या सर्रास वापरायला सुरूवात झाली. प्लॅस्टिकची पाण्याची बाटली आता १० ते १५ रुपयांना मिळते तरीसुध्दा पाणी चांगले प्यायला मिळावे म्हणून लोक तेवढा खर्चही करत आहेत. शेवटी काळाचा महिमा असतो. अनेक सोयी, गैरसोयी यांचा विचार करून लोक सवयी बदलत असतात.

पाण्याची बाटली वापरण्यामध्ये सोय असेल पण ती बाटली आरोग्याला घातक आहे हे बर्‍याच लोकांना माहीत नाही. पाणी भरलेली बाटली विकत घेतली तर ते ठीकआहे. पण एकदा ती बाटली वापरून फेकून दिली पाहिजे असा तिचा नियम आहे. तो नियम कोणी पाळत नसल्यामुळे बाटल्या पुन्हा पुन्हा वापरल्या जातात. मात्र पाण्याची प्लॅस्टिकची बाटली एक पेक्षा अधिक वेळा वापरणे हे आरोग्यासाठी ङ्गारच घातक आहे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात म्हटले आहे. असा प्रकार असल्यामुळे आरोग्य संघटनेने जगातल्या सगळ्याच लोकांना असे आवाहन केले आहे की बाटलीतले पाणी पिऊन होताच तिचा चोळामोळा करून तिला फेकून द्या. ती बाटली दुसर्‍यांदा स्वत:ही वापरू नका आणि अन्य कोणाला तिचा पुन्हा वापर करता येईल किंवा करावासा वाटेल अशा पध्दतीने तिला फेकू नका.

रेल्वेतले अनेक प्रवासी पाण्याची बाटली विकत घेतात आणि त्यातले थोडे पाणी पिऊन उरलेल्या पाण्यासह ती बाटली आपल्या सीटवर तशीच ठेवून गाडीच्या खाली उतरतात. मग ती बाटली कोणतरी हस्तगत करते आणि त्यात कोणतेही नळाचे घाणेरडे पाणी भरून तिला बनावट सील करून् ते पाणी पुन्हा मिनरल वॉटर म्हणून विकते. अशा प्रकारचा उद्योग करणार्‍या टोळ्या अनेक रेल्वे स्थानक परिसरात कार्यरत आहेत. हा तर एक धोका आहेच परंतु पाण्याची बाटली आपण स्वत:ही पुन्हा पुन्हा वापरली तर ती आपल्यालाही घातक असते.

प्लॅस्टीकवर पाण्याची काही प्रक्रिया होत नसावी असा आपला अंदाज असतो. पण बाटलीत पाणी फार दिवस ठेवले तर ते काही विषारी द्रव्ये पाण्यात सोडायला लागते आणि पाणी विषारी होते. लेड मॅन ऑफ इंडिया असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते डॉक्टर व्यंकटेश तुपील यांनी या गोष्टीवर खूप प्रयोग केले आहेत आणि अशा अवस्थेत पाणी कोणत्या द्रव्यांनी विषारी होते याचे विश्‍लेषण केले आहे. त्यानुसार पाण्यात मिसळली जाणारी द्रव्ये ही माणसाच्या शरीरातील विविध यंत्रणांना निकामी करत असतात. विशेषत: प्रजोत्पादन क्षमतेवर या विषारी द्रव्यांचा मोठा परिणाम होतो.

पुरुषांच्या शरीरातील शुक्रजंतूंचे प्रमाण या द्रव्यांमुळे घटते आणि प्रजनन क्षमता कमी होते. या व्यतिरिक्त या द्रव्यांमुळे कर्करोगही होऊ शकतो. या द्रव्यात काहींचा परिणाम माणसांच्या पचनशक्तीवर होऊन त्याला मधुमेह जडण्याची शक्यता असते. जर पाण्यामध्ये प्लॅस्टिकमधून उतरलेल्या द्रव्यांचे प्रमाण फारच वाढले तर त्वचा फिकी होते. उलट्या होऊ शकतात आणि माणसाच्या मज्जासंस्थेवर काही परिणाम जाणवतात. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने बाटली पुन्हा न वापरण्याचा आणि एकदा वापरल्यानंतर ती ताबडतोब रिसायकलिंग करण्याकरिता पाठवण्याचा सल्ला दिला आहे.

भारतामध्ये बाटलीमधले पाणी पिण्याची प्रवृत्ती फारच वाढत चालली आहे. अनेक गृहिणी अशा बाटल्या गोळा करून त्यात पाणी भरून ङ्ग्रीजमध्ये ठेवतात. कार आणि जीपचे ड्रायव्हर थंड पेयाच्या दोन दोन लीटरच्या बाटल्या भरून पाणी घेतात आणि बरेच दिवस ते पाणी वापरतात. बाटलीतल्या पाण्याचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. परंतु त्या पाण्यापासून उद्भवणार्‍या या सगळ्या दुष्परिणामांच्या बाबतीत जनजागृती काहीही झालेली नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment