पाशवी नव्हे मानवी

भारत एकविसाव्या शतकातही अनेक अंध:श्रद्धा उच्छाद मांडत आहेत. नवस बोलले जात आहेत. कार्यसिद्धी व्हावी यासाठी देवांसमोर मुक्या प्राण्यांचे बळी दिले जात आहेत. आपण खरेच महाशक्ती होण्याच्या लायकीचे आहोत का असा प्रश्‍न पडतो. एका बाजूला भारतातला एक विद्वान प्राध्यापक जगातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या हॉर्वर्ड विद्यापीठाचा डीन म्हणून निवडला जात आहे तर दुसर्‍या बाजूला या देशातल्या अंध:श्रद्धांचे प्रदर्शन होत आहे. शिवसेनेनेही पक्षात एकी टिकावी यासाठी, कार्यकर्त्यांना भावनिक दृष्ट्या ब्लॅकमेल करून पक्षात टिकवण्यासाठी शपथ घेणे, गंडा बांधणे, असे मार्ग अवलंबिले आहेत. समाजात अजूनही अंधश्रध्दांचा पगडा कसा कायम आहे हे अशा प्रकारावरून दिसून येते. समाजात अंधश्रध्दांचा सुळसुळाट विकृती वाटावी इतक्या अवस्थेपर्यंत झालेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या एका खेड्यामध्ये एका शिक्षकाला नवसाने मुलगा झाला. हा मुलगा झाला तर तो देवाच्या सेवेसाठी सोडला जाईल असा त्याचा नवस होता. आता हे मूल दोन वर्षाचे झाले आहे आणि या शिक्षकाने बोललेल्या नवसानुसार मुलाला देवासाठी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा मुलगा देवासाठी सोडल्यानंतर पुढे काय करणार याचे चित्र धूसर आहे. पण आपल्या देवाला दिलेल्या कथित वचनासाठी आईबाप त्याचे आयुष्य बरबाद करायला तयार झाले होते.

आपण देवाला बोललो होतो त्यानुसार हे मूल देवासाठी सोडले नाही तर आपल्याला पाप लागेल किंवा देव आपल्यावर कोपेल या कल्पनेने या आईवडीलांनी मुलाला सोडण्याचा प्रकार सुरू केला होता. अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची दखल घेतली आणि हा प्रकार आपल्या परीने टाळण्याची कोशीश सुरू केली. त्यावर मात्र हा शिक्षक सावध झाला आणि त्याने ही प्रक्रिया थांबवली. अशा प्रकारच्या अंधश्रध्देला बळी जाणारा हा गृहस्थ एक शिक्षक आहे ही सर्वाधिक मोठी शोकांतिका आहे. जो शिक्षकाच्या अंधश्रध्देला बळी पडतो तो आपल्या विद्यार्थ्यांना कसा डोळस बनवू शकणार आहे? समाजातल्या अंधश्रध्दा अज्ञानातून निर्माण होतात. परंतु समाजाला ज्ञान देणार्‍या शिक्षकाने तरी या अंधश्रध्देचे वैय्यर्थ जाणायला हवे होते. यात अंधश्रध्दा तर दुःखदायक आहेच परंतु शिक्षकाने अशी अंधश्रध्दा पाळणे ही आपल्या शिक्षणाच्या प्रक्रियेवरची मोठी टिप्पणी आहे. मुळात नवसाने मूल होते अशी कल्पना या शिक्षकाने कशी केली हाच मुद्दा अस्वस्थ करणारा आहे. साधारणपणे कोणतेही स्त्री-पुरष अपत्याला जन्म देण्यास सक्षम असतातच. परंतु निसर्गाच्या एखाद्या अवकृपेने किंवा नेमकेपणाने म्हणायचे झाल्यास प्रजोत्पादन यंत्रणेमध्ये काही दोष निर्माण झाल्याने काही स्त्री-पुरुषांना या नैसर्गिक वरदानापासून वंचित रहावे लागते.

पण हा दोष शारीरिक असतो आणि वैद्यकीय उपचाराने तो दुरूस्त होण्याची जास्त शक्यता असते. नवसाने हे बदल होत नाहीत. परंतु या शिक्षकाची ती समजूत असती तर नवसापायी देवाला मुलगा सोडण्याची ही पाळी त्याच्यावर आली नसती. आपल्या समाजाचे प्रबोधन करण्याची किती गरज आहे हे या गोष्टीवरून कळते. अंधश्रध्देचा हा एक प्रकार झाला. दुसर्‍या प्रकार ऐकल्यास तर अंगावर काटा येतो. पश्‍चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात एका खेड्यातील लोकांनी जो प्रकार केला आहे तो ऐकल्यानंतर आपला देश खरोखर किती मागासलेला आहे याचे प्रत्यंतर येते. या गावातल्या एका आदिवासी मुलीचे दुसर्‍या गावातल्या मुलावर प्रेम होते. परंतु हे प्रेम जात पंचायतीला मंजूर नव्हते. त्या जात पंचायतीने मुलीला आणि मुलाला दोघांनाही जबर दंड ठोठावला. मुलीचे वडील दंड भरण्यास सक्षम नव्हते त्यामुळे त्या दंडाच्या बदल्यात शिक्षा काय तर त्या मुलीवर १२ जणांनी अत्याचार करणे. अशा प्रकारे बलात्कार करण्याची शिक्षा कोणत्या कायद्यात बसते हे त्या खाप पंचायतीच्या पंचांनाच माहीत. एकवेळ या मूर्ख पंचांनी २५ हजाराचा दंड आयताच प्राप्त होऊन चैन करायला मिळत नाही म्हणून चिडून, वैतागून त्या मुलीला ही शिक्षा दिली.

यामध्ये त्यांचा मुर्खपणा होता असे आपण मान्य करू. परंतु ज्या लोकांनी अशा प्रकारे त्या मुलीवर अत्याचार केले त्यांना ते करताना बलात्कार ही एखाद्या महिलेसाठी शिक्षा कशी असू शकेल असा विचार का सुचला नाही? ही शिक्षा तर निव्वळ अमानुषपणाचीच झाली. मानवतेच्या इतिहासामध्ये अशा या पाशवी वृत्तीचे उदाहरण कोठेच सापडणार नाही. खरे म्हणजे आपण असे म्हणताना पाशवी हा शब्द वापरतो आणि निर्दयी शिक्षा या पाशवी असतात असे म्हणून पशूंना बदनाम करतो. परंतु पशू आणि मानव यांच्या लैंगिक व्यवहाराचा तुलनात्मक अभ्यास केला असता असे लक्षात येते की या व्यवहारामध्ये मानवाने जो संयम पाळण्याची गरज आहे असे आपण म्हणतो तो माणूस संयम पाळत नाही आणि पाशवी होतो. परंतु पाशवी शिक्षा म्हणजे अमानुष शिक्षा असे म्हणताना आपण ज्या पशूंना बदनाम करतो ते पशू मात्र लैंगिक व्यवहारामध्ये मानवाकडून अपेक्षित असलेला संयम पाळून मानवालाही लाजवतो आणि पाशवी अत्याचाराच्या ऐवजी मानवी अत्याचार हा शब्द वापरावा असे सूचित करतो. मानवी आणि पाशवी या शब्दांचे अर्थच बदलून चालले आहेत.

Leave a Comment