परिवर्तनाचे संकेत

येत्या लोकसभा निवडणुकीत नेमके काय घडेल याविषयी लोकांच्या मनात जिज्ञासा दाटून आलेली असतानाच दोन सर्वेक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. लोकांच्या मनातल्या जिज्ञासेची पूर्तता या सर्वेक्षणांमुळे झाली आहे. या दोन्ही सर्वेक्षणांच्या निष्कर्षात एक साम्य आहे. दोन्हीतही भाजपाला लोकसभेच्या २०० च्या आसपास जागा मिळतील असेच दिसून आले आहे. मतदानाच्या या चाचण्या कितपत विश्‍वासार्ह असतात, त्या खर्‍या ठरतात की नाही याविषयी दर निवडणुकीत मोठी चर्चा आणि वाद होत राहतात. मतदानाची चाचणी शास्त्रशुद्ध नसते, असे काही लोकांचे म्हणणे आहे आणि पाहण्यांचे निष्कर्ष ज्यांच्या विरोधात जातात त्या पक्षांना हे निष्कर्ष नेहमीच अशास्त्रीय वाटत असतात. अशी त्यावर कितीही उलटसुलट चर्चा झाली तरीही पाहण्या होतच राहतात. त्यांचे निष्कर्ष लोक उत्सुकतेने वाचतातच. तसेच आताही झालेले आहे. जेव्हापासून भारतामध्ये अशा पाहण्या व्हायला लागल्या तेव्हापासून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की, या पाहण्यांच्या निष्कर्षातील प्रत्येक आकडा खरा ठरतोच असे नसले तरी सर्वसाधारण निष्कर्ष बिनचूक राहतात. कॉंग्रेसला १०० जागा मिळतील आणि भाजपाला २०० जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला गेला तर या आकड्यामध्ये पाच किंवा दहा टक्के प्लस-मायनस होईल. पण भाजपाला १०० जागा आणि कॉंग्रेसला २०० जागा एवढा अंदाज नक्कीच चुकणार नाही. म्हणजे या पाहण्यांचे निष्कर्ष वारे कोणत्या दिशेने वहात आहेत हे दाखवणारे नक्कीच असतात.

निकालाविषयी जनतेच्या मनात प्रचंड उत्सुकता असेल तर त्यात काही नवल नाही. कारण या निवडणुकीचे वातावरण असे काही तप्त झालेले आहे की, प्रत्येक नागरीक या निवडणुकीत आणि तिच्या प्रक्रियेत मनाने गुंतून गेला आहे. इंडिया टुडे हे इंग्रजी साप्ताहिक आणि सी-व्होटर ही संस्था यांनी संयुक्तरित्या केलेल्या पाहणीनेे जनतेची ही जिज्ञासा तृप्त करण्याचे काम केले आहे. येत्या काही दिवसांतच निवडणुकांची घोषणा होईल आणि आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर कोणालाही निवडणुकीच्या निकालाचे अंदाज वर्तविता येणार नाहीत. केवळ पाहणी करून ठेवता येईल आणि मतदान संपल्यानंतर आपले निष्कर्ष जाहीर करता येतील किंवा मतदान झाल्यानंतरचे मतदानोत्तर निष्कर्ष जाहीर करता येतील. तूर्तास इंडिया टुडेचा हा सर्व्हे सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. या सर्वेक्षणातून भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा निघालेला निष्कर्ष सर्वाधिक महत्वाचा आहे. कारण सत्ता स्थापन करण्याची संधी कोणाला मिळते हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे.

मोदींची घोडदौड जारी आहे आणि भारतीय जनता पार्टीने मोदी फॉर पीएम अशी मोठी मोहीम सुरू केलेली आहे. मोदींचा घोडा पंतप्रधानपदापर्यंत धावेल का ही मोठी जिज्ञासा आहे. भाजपाला संधी मिळेल का हाही उत्सुकतेचा विषय आहे. या सर्वेक्षणात भाजपाच्या बाबतीत अनुकूल निष्कर्ष निघाले आहेत. कॉंग्रेसच्या बाबतीत मात्र चिंता वाटावी अशीच स्थिती आहे. कॉंग्रेसचे संख्याबळ २०६ वरून ९१ पर्यंत घसरेल, असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. तसे झाल्यास कॉंग्रेससाठी ती अतीशय चिंतेची बाब ठरणार आहे. कारण आतापर्यंत कॉंग्रेसची एवढी घसरण कधी झाली नव्हती. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने आजवरचा ११६ हा नीचांक नोंदवलेला आहे. मात्र त्याच्या खाली हा पक्ष कधी जाईल असे वाटले नव्हते. इंदिरा गांधींनी १५०, सोनिया गांधींनी ११६ असे नीचांक नोंदले होते. आता राहुल गांधी १०० पेक्षा कमी खासदार हा नीचांक नोंदवणार असे दिसत आहे. भारतीय जनता पार्टीच्या १८८ जागा मिळाल्या तरी २७२ हा जादुई आकडा गाठण्यासाठी पक्षाला ८४ खासदारांचा पाठींबा मिळवावा लागणार आहे. भारतीय जनता पार्टीचे एनडीए या आघाडीतील मित्रपक्ष म्हणजे शिवसेना आणि अकाली दल यांची संख्या मिळविल्यास हा आकडा २१७ पर्यंत जाईल असे हे सर्वेक्षण म्हणते.

म्हणजे भाजपाला पंतप्रधानपद मिळविण्यासाठी जवळपास ६० खासदारांचा बाहेरचा पाठींबा मिळवावा लागणार आहे.
म्हणजे सत्ता कोणाची, पंतप्रधान कोण याचे निर्णय ६० खासदार बाळगणार्‍या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या हातात राहणार आहे. जयललिता, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, मुलायमसिंग यादव यांच्या हातात ही सूत्रे असतील. तसे तर जगनमोहन रेड्डी, फारूक अब्दुल्ला, अजितसिंग, चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार, ओमप्रकाश चौताला आणि वेळ पडलीच तर आम आदमी पार्टी यांचीही मदत घेऊन मोदींचे राज्यारोहण करावे लागणार आहे. मात्र जयललिता, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अजितसिंग हे चार नेते या संबंधात भाजपासाठी अधिक उपयुक्त ठरणार्‍या आहेत. कारण त्यांची भाजपाशी कधी ना कधी मैत्री झालेली आहे आणि त्यांचे भाजपाशी चांगले सूत जमते. त्यांच्या राज्यातले त्यांचे प्रादेशिक राजकारण भाजपामुळे बिघडत नाही. त्यामुळे आता जयललिता किती खासदार निवडून आणतात आणि ममता बॅनर्जी किती पाणी तोडतात यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. भाजपाने कोणाचााही पाठींबा घेतला तरी त्याचे भाजपाचे पंतप्रधान मोदी हेच असणार हे भाजपाने त्या पाठींबा देणार्‍या पक्षांना खडसावून सांगितले पाहिजे.

Leave a Comment