परदेशी गुंतवणुकदारांची महाराष्ट्रास पसंती

दावोस – नागपूर, पुणे मुंबईसह नवीन विमानतळ उभारणीत अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविली असल्याचे वृत्त आहे. दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक फोरममध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काही वरीष्ठ अधिकार्‍यांसह सहभागी झाले असून तेथे त्यांनी अनेक परदेशी कंपन्यांशी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात यशस्वी चर्चा केली असल्याचे समजते. चव्हाण तेथील कंपनी प्रमुखांशी बैठका करत आहेत आणि ही चर्चा सकारात्मक ठरते आहे असे सांगितले जात आहे.

चव्हाण यांनी परिषदेच्या पहिल्याच दिवशी जगात आघाडीवर असलेली खाद्यतेल कंपनी कार्गिल, शीतपेये व मद्य बनविणारी कंपनी सॅबमिलर व जपान ट्रेड ऑरगनायझेशन तसेच झुरीच एअरपोर्ट या कंपन्यांशी चर्चा केली असून या सर्व कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणक करण्याची तयारी दर्शविली आहे. झुरीच कंपनीने बंगलोर विमानतळाचे काम केले असून पुणे, मुंबई व नागपूर येथील विमानतळ उभारणीत त्यांना रस आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादन लक्षात घेऊन कार्गिल कंपनीचे डेव्हीड मॅकलेनन यांनी गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविली असून ते पुढील चर्चेसाठी लवकरच मुंबईला भेट देणार आहेत.

जपान ट्रेड असोसिएशन नेही महाराष्ट्रात उद्योग उभारणीसंदर्भात दीर्घ चर्चा मु्ख्यमंत्री चव्हाण यांच्याबरोबर केल्या असून त्यांनीही नागपूरसह तीन विमानतळ उभारणीत गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे असेही समजते.

Leave a Comment