कालबाह्य गंडेदोरे

एखादा पक्ष वाढवण्याची या एकविसाव्या शतकातली रीत काय असावी ? शपथा देणे, देवाच्या नावाने प्रतिज्ञा करायला लावणे किंवा बेलभंडारा उचलणे या पद्धती नक्कीच नसाव्यात. पण शिवसेनेने असाच मार्ग अवलंबिला आहे. लाखो शिवसैनिकांना जाहीर सभेत शपथ घ्यायला लावलीय आणि गंडे बांधून निष्ठांची ग्वाही घेतली आहे. असले गंडे दोरे कलेच्या आणि धार्मिक संघटना आणि पंथांमध्ये चालतात. शपथांनी आणि दोरे ताईत बांधून शिष्याला बंधनात घेण्याची प्रथा गुप्त संघटनात रूढ असू शकते पण शिवसेनेने त्यांचे अनुकरण करीत कार्यकत्यार्ंंना दोरे बांधण्याचा कार्यक्रम जाहीररित्या पार पाडला. ही कल्पना ज्याच्या डोक्यातून निघाली असेल त्याला पुरस्कार दिला पाहिजे. गंडेही बांधले गेले आणि अनेकांना शिवीगाळही केली गेली. देशात निवडणुकीची हवा वेगाने वहायला लागली असल्याने अशी शिवीगाळ अपेक्षितच आहे. विद्वत्तापूर्ण, सयुक्तिक आणि तर्कशुध्द अशी समाज प्रबोधनपर भाषणे होण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. एकवेळ भाषण प्रबोधनपर नसेल तर चालेल परंतु निवडणुकीचे शांततेचे वातावरण विचलित करणारे शिवराळ भाषण हे नेहमीच घातक ठरत असते. भाषण शिवराळ असेल तर ते ऐकताना लोकांत हशा पिकतो, टाळ्या मिळतात, त्यांची करमणूक होते आणि गर्दी जमते.

अशा विक्रमी गर्दीच्या सभांमधून विचाराच्या पातळीवर काय निष्पन्न होते याचा शोध घेतल्यास निराशा हाती पडते. आक्रमक भाषण म्हणजे आव्हानात्मक भाषेतले भाषण असे समीकरण रूढ झाले असल्यामुळे भाषणे अधिकाधिक शिवराळ करण्याकडे उध्दव ठाकरे यांचा कल आहे. तेव्हा इशारे देणे, धमक्या देणे, अमूक होऊ देणार नाही, तमूक घडू देणार नाही, पाय ठेवू देणार नाही, सभा होऊ देणार नाही अशा धाटणीची वाक्ये त्यांच्या भाषणातून प्रकर्षाने पुढे यायला लागली आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतल्या सभेला चोख उत्तर देण्यासाठी त्यांच्यापेक्षा मोठी सभा घेण्याचा निर्धार केला आणि शिवसेनेची जेवढी म्हणून संघटनात्मक ताकद आहे तेवढी पणाला लावून गावागावातून मोठीच गर्दी जमवून दाखवली. गर्दी हा जमवण्याचा प्रकार आहे की जमण्याचा प्रकार आहे असा सध्या प्रश्‍न पडला आहे. भाषण चांगले असावे, उद्बोधक असावे, प्रेरक असावे आणि श्रोत्यांच्या अंतःकरणाला हात घालणारे असावे. तसे ते असल्यास गर्दी जमवावी लागत नाही. लोकच स्वतःहून सभेला येतात. सध्या नरंेंद्र मोदी यांच्या सभेला होणारी गर्दी सुध्दा अशी जमवूनच आणलेली असते.

भारतीय जनता पार्टीचे नेते पूर्वी असा प्रकार करत नव्हते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभांना हजारो लोक स्वयंस्फूर्तीने येत असत. पण आता मोदींच्या सभांमध्ये प्रयत्नपूर्वक गर्दी जमा केली जाते. जमलेल्या गर्दीसमोर नेमके काय बोललो यापेक्षा ती गर्दी किती मोठी होती याला अनावश्यक महत्त्व यायला लागले आहे. म्हणून उध्दव ठाकरे यांच्या सभेचा सारा भर ती मोदीपेक्षा मोठी होती यावरच राहिला. सभेमध्ये उध्दव ठाकरे यांनी कोणता विचार पेरला याला त्यांनीही महत्त्व दिले नाही आणि गर्दीनेही तसा विचार केला नाही. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांचे भाषण आक्रमकतेत बर्‍यापैकी वरचढ झाले असले तरी आशयाच्या अंगाने त्यात काहीच नव्हते. त्याच त्या जुन्या कल्पना आणि तेच ते घासूनपूसन गुळगुळीत झालेले विचार या पलिकडे या सभेतून पदरात काहीच पडत नव्हते. येत्या निवडणुकीमध्ये मतदारांनी शिवसेनेला मते का द्यावीत याचे स्पष्टीकरण या भाषणात कोठेच नव्हते. आता दिल्लीत आमची सत्ता येणार आहे. महाराष्ट्रातही आम्हीच सत्तेत येणार आहोत. अशी भविष्यवजा वाक्ये उच्चारल्याने फार तर कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढत असेल परंतु तुम्ही सत्तेत का येणार आहात आणि आल्यानंतर काय करणार आहात याच कसलाच खुलासा या भाषणातून झाला नाही.

कार्यकत्यार्र्ंना शपथ देणे, गंडे बांधणे असे मध्ययुगात शोभणारे प्रकार शिवसेनेने आता सुरू केले आहेत. गंडा बंधन हे नेमके कशासाठी असते आणि एकदा गंडा बांधला म्हणून तो जन्मभर तोडायचा का नसतो याचा कसलाच शास्त्रशुध्द खुलासा या सभेत झाला नाही. गंडा बंधन आणि शपथा असे प्रकार अजूनही सुरू असतील तर त्यांचाही समावेश या विधेयकात करावा लागेल. आपल्या देशात मंत्रीसुध्दा शपथा घेतात आणि शपथा मोडतात. एखादे काम करण्यासाठी शपथ घेतली म्हणजे ते काम केलेच पाहिजे अशी एक भावना समाजामध्ये आहे. परंतु शपथ घेऊनसुध्दा ते काम केले नाही तर नेमके काय होते हे अजून कोणालाही माहीत नाही. मात्र मंत्री शपथेशी इमान राखत नाहीत. पण सामान्य शिवसैनिक घेतलेली शपथ मोडणार नाही असा विश्‍वास उध्दव ठाकरे यांना वाटत असावा महाराष्ट्रामध्ये विविध पक्षांत असे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत की ज्यांनी कसलीही शपथ घेतलेली नाही पण ती घेतली नसली तरी आपल्या पक्षाचे काम इतक्या निष्ठेने केले आहे ही जाहीर सभेत शपथ घेणारा शिवसैनिक काय करू शकेल? मुळात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना गंडे बांधून जोडण्यापेक्षा विचाराच्या पातळीवर जोडायला हवे आहे.

Leave a Comment