ब्रॉडबँडचा सर्वाधिक वेग मिळविण्यात यश

लंडन – आहे त्याच टॉवर लाईन्सच्या माध्यमातून ब्रॉडबँड इंटरनेटचा सर्वाधिक वेग मिळविण्यात लंडन येथे यश आले असल्याचे समजते. ब्रिटीश टेलिकॉम आणि फ्रेंच नेटवर्कींग इक्विपमेंट कंपनी अल्काटेल लुसेंट यांच्या संयुक्त सहकार्यातून वैज्ञानिकांनी ही किमया साध्य केली आहे. हा वेग १.४ टेट्राबाईट इतका आहे. म्हणजे एकाचवेळी ४४ हायडेफिनेशन चित्रपट प्रसारित करण्यासाठी जेवढा वेग आवश्यक असतो तितकाच हा वेग आहे.

सध्या वापरात असलेल्या फायबर नेटवर्कवरूनच हा वेग मिळविता येणे ही खरी अचिव्हमेंट असल्याचे ऑप्टिकल मार्केटिंगचे प्रमुख केविन डुरे यांचे म्हणणे आहे. लंडनमधील फायबर नेटवर्कवरून हा वेग मिळविण्याच्या चाचण्या आक्टोबर नोव्हेंबरपासूनच सुरू होत्या. मध्य लंडनमधील बीटी टॉवर लाईनवर कोणतेही अपग्रेडेशन न करता वैज्ञानिकांनी हा वेग मिळविण्यात यश मिळविले. याचा सर्वाधिक फायदा इंटरनेट सेवा पुरवठादारांना होणार असून यामुळे अत्यंत अल्प वेळात आणि कोणताही जादा खर्च न करता महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे असे समजते.