भारतीय प्रवाशांना थायलंडची भुरळ

मुंबई – गेल्या दोन वर्षात सर्वाधिक संख्येने भारतीय प्रवाशांनी थायलंडला भेट दिली असल्याचे हॉटेल्स डॉट कॉम च्या हॉटेल प्राईस इंडेक्ससाठी झालेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. भारतीय प्रवाशांनी बँकॉक, फुकेट आणि पटाया या थायलंडमधील पर्यटनस्थळांना अधिक पसंती दिली असून या शहरांनी पहिल्या दहा परदेशी पर्यटन स्थळांत स्थान मिळविले आहे.

थायलंड शिवाय सिंगापूर, हाँगकाँग आणि मलेशियातील क्वालांलंपूरलाही भारतीय प्रवाशांनी पसंती दिली असून अन्य पर्यटन स्थळात त्यानंतर दुबई,लंडन, न्यूयॉर्क, लासवेगास यांचा समावेश आहे. देशांतर्गत पर्यटनात दिल्ली, मुंबई, गोवा, बंगलोर, चेन्नई आणि जयपूर ही शहरे आघाडीवर आहेत. ताजमहालासाठी प्रसिद्ध असलेल्या आग्रा शहराची मात्र या यादीत घसरण झाली असून त्याचे स्थान गतवर्षीच्या सातव्या स्थानावरून नवव्या स्थानावर घसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.