अभी तो हम जवान है

कोणताही माणूस स्वत:ला वृद्ध कधी समजतो यावरून त्याच्या मनोवृत्तीवर प्रकाश पडत असतो. काही काही लोक चाळीशी-पंचेचाळीशी उलटली की, आता आमचे काय राहिले, असे म्हणायला लागतात. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असतो. याउलट अनेक लोक साठी-पासष्टीत सुद्धा अभी तो हम जवान है असे म्हणतात. काही लोकांना वयाच्या ५८ व्या वर्षी सेवेतून निवृत्त व्हावे लागते. तसा नियम आहे म्हणून त्यांना निवृत्ती स्वीकारणे भाग पडते. परंतु त्यांची कार्यक्षमता अजून टिकून असते आणि ते म्हणतात, ‘वुई आर रिटायर्ड बट नॉट टायर्ड.’ अशा या प्रवृत्तीमुळे ब्रिटनमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले.

लोक स्वत:ला कोणत्या वयात वृद्ध समजतात, त्यात महिलांची समजूत काय आणि पुरुषांची समजूत काय, असे वेगवेगळे निष्कर्ष काढण्यात आले. कारण या सर्वेक्षणातून आलेल्या उत्तरावरूनच आपला समाज नकारार्थी विचार करणारा आहे की सकारात्मक विचार करणारा आहे हे आपल्याला कळत असते. पहाणीमध्ये असे आढळून आले की, ब्रिटीश लोक ५९ वे वर्ष ओलांडले की, स्वत:ला वृद्ध समजायला लागतात. त्यातही पुरुषांच्या आणि महिलांच्या उत्तरांचे वेगळे विश्‍लेषण केले असता पुरुष ५८ व्या वर्षी स्वत:ला वृद्ध समजतात असे आढळून आले. महिलांच्या बाबतीत मात्र हे वय ६० वर्षे आहे. म्हणजे ब्रिटनमधल्या महिला पुरुषांपेक्षा अधिक सकारात्मक विचार करणारे आहेत. साधारणपणे २१०० लोकांना या सर्वेक्षणात प्रश्‍न विचारण्यात आले.

पन्नाशी ओलांडलेल्या लोकांना त्याची प्रश्‍नावली देण्यात आली. त्या प्रश्‍नावलीमध्ये असाच प्रश्‍न मध्यम वयाविषयी विचारण्यात आला होता. पुरुषांनी ३८ व्या वर्षी माणसाचे तारुण्य संपते आणि तो मध्यमवयीन होतो असे म्हटले तर महिलांनी ही तारुण्याची मर्यादा ४२ व्या वर्षापर्यंत लांबवली. आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्याची कल्पना सुद्धा कोणाला सुचणार नाही. पण ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये अशी अनेक सर्वेक्षणे सातत्याने सुरू असतात आणि त्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अतीशय गांभीर्याने काढले जातात. एवढेच नव्हे तर त्या निष्कर्षावरून सरकारचे नियोजन सुद्धा ठरत असते. सकृतदर्शनी मात्र कोणाही भारतीय माणसाला हे सर्वेक्षण म्हणजे रिकाम टेकडेपणा वाटेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment