हवेत उडू शकणारे, तसेच एरियल फोटोग्राफीसाठी पुरेसे शक्तीमान कॅमेरे असलेले आणि काम संपल्यानंतर सहज फोल्ड करून खिशात घालता येणारे ड्रोन अमेरिकेतील उत्पादकाने तयार केले आहे. पॉकेट ड्रोन असेच त्याचे नामकरण केले गेले असून ते सर्वसामान्यांनाही परवडेल अशा किमतीला उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या ड्रोन मध्ये उच्च प्रतीचा कॅमेरा बसविला गेला आहे. त्यामुळे एरियल फोटोग्राफी तसेच व्हीडीओ शूटिगही करता येते. याची बॅटरी रिचार्जेबल आहे आणि हे ड्रोन हवेत २० मिनिटांपर्यंत उडू शकते. त्याचे वजन केवळ ४५० ग्रॅम इतकेच आहे आणि त्याचे नियंत्रण रिमोटच्या सहाय्याने करता येतेच पण ते अॅड्राईड फोन अथवा टॅब्लेटच्या सहाय्यानेही करता येते. काम संपले की हे ड्रोन घडी घालून ठेवता येते. पुन्हा जुळणी करायची असेल तेव्हा अवघ्या २० सेकंदात जुळणी करता येते.
या ड्रोन चे निर्माते टिमोथी रॉयटर, टी.जे. जॉन्सन व चान्स रोथ म्हणतात की आजपर्यंत या आश्वर्यकारक तंत्रज्ञानात बराच मोठा वर्ग सहभागी होऊ शकत नव्हता कारण हे तंत्रज्ञान खर्चिक होते. तसेच ड्रोन मोठ्या आकाराची व त्यासाठीचे सॉफटवेअरही गुंतागुंतीचे होते. मात्र नवीन संशोधनामुळे आता हे ड्रोन कुणालाही घेता येणार आहे. त्याची कंट्रोलरविना किमत ४४५ डॉलर्स तर कंट्रोलरसह किमत ४९५ डॉलर्स इतकी आहे.