पप्पू कलानीचे नगरसेवकपद जाणार

मुंबई – गुन्हेगार ठरवून शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींचे पद काढून घेण्याच्या निर्णयाची अम्मलबजावणी राज्य निवडणूक आयोगाने हाती घेतली असून त्यात प्रथम उल्हासनगरचे नगरसेवक पप्पू कलानी यांचे पद काढून घेतले जाईल असे खात्रीलायक वृत्त आहे.

निवडणूक आयोगाने यापूर्वीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि गुन्ह्यात शिक्षा झालेल्यांना निवडणूक लढविता येणार नाही असा नियम केला आहे. मात्र आजपर्यंत या नियमाची काटेखोर अम्मलबजावणीच न झाल्याने आजही शिक्षा झालेले अनेक गुन्हेगार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. पप्पू कलानी याला २३ वर्षांपूर्वी झालेल्या  इंदर भटिजा याच्या खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे. कलानीला असलेल्या राजकीय अभयामुळे आजपर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही.

लोकप्रतिनिधी निवडताना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक निवडले जाऊ नयेत या नियमाची अम्मलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सक्त सूचना दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने कारवाईची सुरवात करण्याचे ठरविले आहे. ज्यांना शिक्षा झाली आहे त्यांचे प्रतिनिधित्व रद्द करण्याबरोबरच पुढील सहा वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची तरतूद या नियमांत आहे.

Leave a Comment