चिनी मुलांवर वधू आयात करण्याची पाळी

गेली तीन दशके कम्युनिस्ट चीनमध्ये कडकपणे राबविल्या गेलेल्या एकच अपत्य योजनेचे दुष्परिणाम जाणवू लागले असून उपवर चिनी मुलांना वधू मिळणे दुरापास्त बनले आहे. परिणामी या मुलांनी परदेशातील मुली मिळविण्याची धडपड सुरू केली असल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये मुलगा हाच वंशाचा दिवा असतो असा समज अन्य आशियाई देशांप्रमाणेच दृढ आहे. त्यामुळे आजही मूल जन्माला येण्याअगोदरच मुलगा की मुलगी हे तपासले जाते आणि मुलगा असेल तरच जन्माला घातला जातो. त्यात एकच मूल योजनेत अशा अनेक मुलींची गर्भातच हत्या केली गेल्याने चीनमध्ये आता मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. आणि त्यातूनच वरील जटील समस्या निर्माण झाली आहे.

दुसरीकडे वधूपित्यांना चांगला चॉईस मिळविणे शक्य झाले आहे मात्र त्यांची पसंती आर्थिक दृष्ट्या सधन आणि उच्चशिक्षित मुलांनाच अधिक असते. त्यामुळे मुलगा झालेल्या जोडप्यांना त्याच्या जन्मापासूनच बचत करण्याची पाळी आली आहे. मात्र तरीही वधू मिळेल याची खात्री नाही. परिणामी चिनी मुलांनी परदेशात वधू संशोधन सुरू केले असून त्यात व्हिएटनामी मुलींना अधिक पसंती दिली जाते आहे. सुमारे ३ कोटी ४० लाख तरूण वधूसंशोधनातील समस्यांचा आज सामना करत आहेत असेही समजते.

चीनची २०१३ सालातील लोकसंख्या पाहता त्यात ६९ कोटी ७० लाख पुरूष तर ६६ कोटी ३० लाख महिला आहेत. ही असमानता तरूण मुलांच्या विवाहमार्गात अडथळा बनली आहे.

Leave a Comment