रणजी करंडक- महाराष्ट्र अंतिम फेरीत

इंदूर- महाराष्ट्राने सोमवारी तिस-याच दिवशी बंगालचा १० विकेटनी पराभव करत रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली. १९९१-९२ नंतर महाराष्ट्राला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. आता कर्नाटक आणि पंजाब यांच्यातील विजेत्याशी महाराष्ट्र अंतिम फेरीत खेळेल. विशेष म्हणजे ह्यग्रुप सीह्णमधून येऊन महाराष्ट्राने ही बाजी मारली.

आतापर्यंत या रणजी हंगामात महाराष्ट्राने एकही लढत गमावली नव्हती हे त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे विशेष आहे. पहिल्या डावात ११४ धावांत गारद झाल्यावर बंगालने दुस-या डावात ब-यापैकी फलंदाजी केली. वृद्धिमान सहाचे नाबाद शतक (१०८) बंगालला डावाने पराभव टाळण्यासाठी उपयोगी पडले. मात्र सहाचा अपवाद वगळता बंगालचे अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

पहिल्या डावात सात विकेट घेणारा वेगवान गोलंदाज समद फल्लाहने दुस-या डावातही तीन विकेट घेतल्या. महाराष्ट्राकडून अनुपम संक्लेचा आणि डॉमनिक जोसेफ यांनीही प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. बंगालचा दुसरा डाव ३४८ धावांत आटोपल्यावर महाराष्ट्राने विजयासाठी अवघे आठ धावांचे आव्हान सहज पार केले.

कर्नाटकला पहिल्या डावात आघाडी
मोहाली- रणजी करंडकाच्या अन्य उपांत्य लढतीत कर्नाटकने पंजाबविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली. पंजाबच्या २७० धावांना उत्तर देताना कर्नाटकने दिवसअखेर पाच बाद ३५१ धावांची मजल गाठली. आता कर्नाटककडे ८१ धावांची आघाडी आहे. करुण नायरचे सलग तिसरे शतक (खेळत आहे १०७) हे कर्नाटकच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. विशेष म्हणजे २२ वर्षीय करुण यंदा पहिल्याच रणजी हंगामात खेळत आहे.

Leave a Comment