प्राणीसंग्रहालयात जाऊन प्राणी पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष जंगलात जाऊनच या वन्य प्राण्यांचे दर्शन घेण्याची आवड असलेल्यांसाठी मध्यप्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यान अतिशय योग्य असे ठिकाण आहे. उमरिया जिल्ह्यातील बांधवगड राष्ट्रीय उद्यान १९६८ साली घोषित करण्यात आले असून येथील घनदाट जंगल, अनेक प्रकारच्या वनस्पती, वृक्ष याचबरोबर येथे आढळणारे वन्यप्राणी पर्यटकांच्या नजरेला मेजवानीच देतात असे म्हटले तर वावगे ठरू नये.
येथील जंगलात २२ प्रकारचे वन्य प्राणी आढळतात तसेच २५० वियिध जातीचे पक्षीही पाहायला मिळतात. वाघ, बिबटे, बाराशिंगे, गवे, रानटी डुकरे आणि कुत्री, चितळ, नीलगाय, चिंकारा, सांबर असे विविध प्राणी येथे दिसतातच पण प्रमुख आकर्षण आहे ते पांढरे वाघ. हत्तीवरून अथवा उद्यानाच्या वाहनातून सैर करून हे प्राणी पाहता येतात. याच जंगलात दोन हजार वर्षापूर्वीचा बांधवगड किल्लाही आहे आणि येथील अनेक गुहांमधून मानवाने काढलेली प्राचीन चित्रेही पाहायला मिळतात.
बांधवगडमधील रेवा संस्थानच्या महाराजांना वाघ शिकारीचा मोठाच शौक होता आणि या वाघांच्या शिकारीनेच त्यांच्या महालांची सजावट होत असे असे सांगतात. १०९ वाघ मारणारा राजा शुभलक्षणी समजला जात असे.१९१४ सालात राजा असलेल्या वेंकटसमण सिह यांनी तब्बल १११वाघ मारले होते असेही सांगितले जाते.
बांधवगडला जाण्यासाठी रेल्वे, रस्ते यांची चांगली सोय असून जबलपूर, उमरिया, बिलासपूर, सतना येथून खासगी गाड्या आणि टॅक्सीही मिळू शकतात.