वॉलमार्टची भारतात नवीन कंपनी स्थापन

नवी दिल्ली – जागतिक रिटेल व्यवसायातील नामवंत कंपनी वॉलमार्टने भारतात नवी कंपनी स्थापन केली असल्याचे मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्सकडील आकडेवारीवरून उघड झाले आहे. वॉलमार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ही कंपनी स्थापन केली गेली असून वॉलमार्ट भारतात नवीन भागीदाराच्या शोधात असल्याचेही समजते.

यापूर्वी वॉलमार्टने भारतीय बाजारात व्यवसायासाठी भारती एन्टरप्रायझेज बरोबर भागीदारी केली होती. ही भागीदारी आक्टोबरमध्ये संपुष्टात आली आणि या दोन्ही कंपन्यांनी स्वतंत्रपणे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे वॉलमार्ट आता नवीन भागीदारच्या शोधात आहे.

भारतीय बाजारात प्रवेशासाठी २००८ साली वॉलमार्टने अमेरिकन लॉमेकरबरोबर लॉबिंग केल्याची खबर येताच भारत सरकारने एक सदस्यीय समिती नेमून या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र या चौकशीतून कांहीही निष्पन्न झाले नसल्याचे समजते. अमेरिकेत लॉबिंग कायदेशीर आहे मात्र भारतात लॉबिंगला बंदी आहे.