मोदींचे ब्ल्यू प्रिंट

भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपात देशाच्या विकासाचे आपले संकल्प चित्र मांडले. दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी भाजपावर टीका करताना, भाजपाचे नेते टकल्याला सुद्धा कंगवा विकून दाखवतात असा पाचकळ विनोद करून आपली अक्कल दाखवून दिली होती. परंतु मोदींच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये कसलेही सवंग मार्केटिंग दिसले नाही. देशाची क्षमता, उपलब्ध साधन सामुग्री आणि आपण काय करू शकतो याचा निश्‍चित अंदाज यांच्या आधारावर वास्तववादी चित्र मांडण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या चहावाला असण्यावर बरीच चर्चा होत आहे आणि त्यावरून मणिशंकर अय्यर हे टीकेचे धनी झाले आहेत. परंतु देशाच्या विकासाची आपली कल्पना मांडताना नरेंद्र मोदी हे चहावाले आहेत असे कुठे जाणवले नाही. देशाच्या विकासाची पुढच्या काही वर्षांतली योजना डोळ्यासमोर ठेवणारा विकासाभिमुख नेता हेच त्यांचे रूप या ब्ल्यू प्रिंटमधून समोर आले. शेवटी भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक हा प्रचाराचाच एक भाग होता. त्यामुळे सोनिया आणि राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला मोदींनी उत्तर देणे साहजिक होते. तसे त्यांनी ते िदलेले आहे. परंतु त्यापेक्षाही त्यांनी मांडलेली विकासाची कल्पना अधिक विचार करायला लावणारी आहे.

कोणताही राजकीय पक्ष निवडणुका जवळ आल्या म्हणजे हेच करत असतो. परंतु तरीही सगळ्याच राजकीय पक्षांचे असे कार्यक्रम एकसारखे नसतात. शेवटी विचार करण्याच्या पद्धतीतही मोठा फरक असतो. किंबहुना त्याच फरकामुळे मोदी हा आज देशामध्ये आकर्षणाचा विषय झालेला आहे. नरेंद्र मोदी विकासाची एक मोठी कल्पना मांडत आहेत. त्यामागे लोकांची मते मिळावीत हा हेतू ठेवलेला दिसत नाही. राहुल गांधींच्या व्हिजनमध्ये मात्र या लोकसभा निवडणुकीत आपल्याला कशाने मते मिळतील याचाच विचार मध्यवर्ती ठेवलेला दिसत होता. आपल्या देशातली ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेतीचे उत्पन्न म्हणावे तसे वाढत नाही. कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात शेती उत्पादन दर साल केवळ अडीच किंवा तीन टक्क्यांनी वाढताना दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी गरीब राहिला आहे. समाजातले अन्य वर्ग मात्र शेतकर्‍यांपेक्षा अधिक गतीने श्रीमंत होत असल्याने देशातली आर्थिक विषमता वाढली आहे.

नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मात्र शेतीचा विकास दर १४ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तो देशभर का वाढत नाही याची कारणेही मोदींनी आपल्या व्हिजनमध्ये दाखवलेली आहेत. पहिले कारण म्हणजे शेती क्षेत्रात सरकारची गुंतवणूक कमी झाली आहे आणि शेतीला हक्काचे पाणी देण्याची क्षमता असलेली गंगा-कावेरी योजना कॉंग्रेस सरकारने अडगळीला टाकली आहे. या दोन योजनांचे आश्‍वासन मोदींच्या व्हिजनमध्ये आहे. जगात सध्या भारताची रेल्वे व्यवस्था सर्वात मोठी समजली जाते. परंतु तिच्या वेगाच्या बाबतीत आपण फार मागे आहोत. भारतातल्या रेल्वेगाड्यांपैकी काही अपवादात्मक गाड्या ताशी १०० कि.मी. वेगाने धावतात. मात्र देशातल्या रेल्वेगाड्यांचा सरासरी वेग ताशी ५५ कि.मी. एवढाच आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि जपान या देशात मात्र ताशी ३०० कि.मी. वेगाने धावणार्‍या रेल्वेगाड्या ही अगदी नेहमीची बाब झालेली आहे. वेगाने धावणार्‍या रेल्वेगाड्या हे विकासाचे मोठे साधन ठरणार आहे. त्या बुलेट गाड्यांचा आग्रह मोदींनी धरला आहे आणि २०२२ सालपर्यंत भारताचे चार कोपरे बुलेट ट्रेनने जोडले जातील अशी योजना आखली आहे. नरेंद्र मोदी यांनी पाच गोष्टींवर भर दिलेला आहे. ट्रेड, टॅलन्ट, टेक्नॉलॉजी, टूरिझम आणि टे्रडिशन.

भारताच्या पर्यटन व्यवसायाला प्रचंड संधी आहे, पण युपीए सरकारने हे क्षेत्र मोठेच उपेक्षित ठेवले आहे. त्याचा विकास केल्यास फारशी गुंतवणूक न करता, पर्यावरणाचे नुकसान न करता आपल्याला लाखो रोजगार निर्माण करता येतात. त्यावर भर देण्याचा मोदींचा विचार आहे. देशातली ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. परंतु महिलांच्या विकासाच्या बाबतीत म्हणावे तसे काम झालेले नाही. त्यावर मोदींचा भर आहे. टेक्नॉलॉजी हा सध्याच्या युगामध्ये परवलीचा शब्द झाला आहे आणि भारतात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी यांचा विकास केल्याशिवाय प्रगती करता येणार नाही. म्हणून नरेंद्र मोदींनी प्रस्तावित केलेल्या फाइव्ह टी मध्ये टेक्नॉलॉजीवर जोर दिलेला दिसतो. त्यासाठी प्रत्येक राज्यात एक आयआयटी उभारण्याची कल्पना त्यांनी मांडली आहे. आपण माहिती तंत्रज्ञानात खूप मजल मारलेली आहे. या क्षेत्रातले उद्योग केवळ मोठ्याच शहरात केले पाहिजेत असे नाही. लहान गावात सुद्धा कॉल सेंटर्स आणि बीपीओ उभारता येतात. परंतु त्यासाठी देशभर ऑप्टिकल फायबरचे जाळे पसरलेले असले पाहिजे. ही गोष्ट मोदींनी प्रकर्षाने मांडली आहे.

Leave a Comment