लंडन- शिकणे, शिकलेल्या विषयांची एकमेकांत देवाणघेवाण करणे ही आता केवळ मानवाची मक्तेदारी राहणार नाही. वैज्ञानिकांनी एकमेकांत माहितीची देवाणघेवाण करू शकतील असे रोबो तयार केले असून त्यांच्या चाचण्या इंडोवेन विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ताप्तुरत्या रूग्णालयात घेतल्या जात आहेत असे समजते.
याच विद्यापीठातील वैज्ञानिक रेनेवान मोलेनग्राफ्ट यांनी हे संशोधन केले असून ते म्हणाले की यासाठी रोबो अर्थ नावाचे वर्ल्डवाईड वेब तयार केले गेले जात आहे. याचा वापर करून रोबो त्यांच्याकडे असलेल्या माहितीची देवाणघेवाण दुसर्या रोबोबरोबर करू शकतील. हे वेब म्हणजे आकड्यांचे एक मोठे गोदामच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या संशोधनासाठी आणि प्रयोगांसाठी पाच अन्य विद्यापीठांनीही सहकार्य केले आहे.
या चाचण्यांसाठी चार रोबो निवडले गेले आहेत. खास करून रूग्णालयातील एकाकी रूग्णाची मदत करण्याचे प्रशिक्षण त्यांना येथे दिले जात आहे. यातील एक रोबो रूग्णाच्या खोलीचा नकाशा वेबसाईटवर अपलोड करेल ज्यामुळे रूग्णाच्या भेटीसाठी येणार्याना अडचण येणार नाही. घरच्या कामांत मदत करू शकणारे म्हणजे धूळ स्वच्छ करणे, खिडक्या साफ करणे, गवत कापणे ही कामे करणारे रोबो सध्याही वापरात आहेत. मात्र शारीरिक दृष्ट्या कमजोर अथवा अपंग आणि वृद्धांना सर्वतोपरी मदत करणारे रोबो प्रत्यक्षात येण्यास आणखी दहा वर्षे लागतील असे या संशोधकांचे म्हणणे आहे.