छातीत दुखू लागल्याने शशी थरूर एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली – केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री शशी थरूर यांना छातीत दुखू लागल्याने एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते. त्याच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी थरूर यांची कसून चौकशी केली आणि त्याचाच त्रास थरूर यांना झाल्याचे त्यांचे सचिव अभिनवकुमार यांनी सांगितले. सुनंदा पुष्कर यांचे पोस्ट मार्टेमही याच रूग्णालयात सकाळी केले जाणार आहे.

काल म्हणजे शुक्रवारी रात्री दिल्लीच्या लिला या पंचतारांकित हॉटेलात सुनंदा यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.थरूर यांच्या पाकिस्तानी पत्रकार मेहर यांच्याबरोबर असलेल्या तथाकथित अफेअरमुळे सुनंदा निराश झाल्या होत्या. मात्र त्यानंतर या दोघांनीही असा कोणताही प्रकार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कांही काळातच सुनंदा यांचा मृतदेह सापडला.

सुनंदा आणि शशी थरूर यांचा विवाह ऑगस्ट २०१० सालीच झाला असून दोघांचाही हा तिसरा विवाह होता. मात्र नियमाप्रमाणे विवाहास सात वर्षे पूर्ण होण्याअगोदरच सुनंदा यांचा मृत्यू झाल्याने थरूर यांची चौकशी एसडीएम तर्फे केली जाणार आहे. शुक्रवारी सुनंदा यांचा मृतदेह सापडला तेव्हा थरूर नुकतेच काँग्रेसच्या बैठकीहून परतले होते. सुनंदा यांच्या मृत्यूची बातमी त्यांचे सचिव अभिनवकुमार यांनीच पोलिसांना दिली होती.

या सर्व प्रकारामुळे थरूर यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल असा कयास वर्तविला जात आहे.

Leave a Comment