शिवसेनेच्या शिबिरात मोदी विरोधी सूर

अलिबाग – नरेंद्र मोदींच्या नावाचा डंका भाजपचे नेते देशभरात वाजवत असले तरी भाजपच्या मित्र पक्षांमध्ये मात्र या ‘मोदी नाम जपा’मुळे प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिका-यांच्या शिबिरात ही नाराजी जाहीरपणे दिसली. सतत मोदी नाव घेण्याला विरोध करून कार्यकर्त्यांनी ‘एकच साहेब बाळासाहेब’ अशा घोषणा दिल्या.अलिबाग येथे सुरू असलेल्या युवा सेनेच्या पदाधिका-यांच्या शिबिरात सोशिअल मीडियावर एक विशेष व्याख्यान ठेवण्यात आले होते.

यासाठी दिल्लीवरून भाजप मीडिया सेलचे काम सांभाळणारे अरविंद गुप्ता यांचे मार्ग दर्शनपर भाषण सुरू होते. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मीडिया सेल कसे काम करते आहे यावर त्यांचे भाषण सुरू असताना त्यांनी वारंवार नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख सुरू ठेवला होता. मोदी यांचा एखादा मेसज काही क्षणात दीड कोटी जनतेपर्यंत पोहोचतो. इतका वेग सध्या भाजपच्या मीडिया सेलचा आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. इतक्यात सभागृहातील एका व्यक्तीने प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. भाजपला फक्त मोदीच दिसतात का? एनडीएतील अन्य मित्रपक्षांचा विचार भाजप का करत नाही? केवळ दीड कोटी मतांनीच मोदींना पंतप्रधानपद मिळणार आहे?, असे एकावर एक प्रश्न विचारत त्याने गुप्ता यांना अडचणीत आणले.

त्यानंतर कोल्हापूरच्या कार्यकर्त्याने देखील गुप्ता यांना भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली. शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप उमेदवाराच्या विभागात काम करतात मात्र शिवसेनेचा उमेदवार ज्या विभागात उभा असतो तिथे भाजपचे कार्यकर्ते काम करत नाही? या प्रश्नांनंतर सभागृहात एकच साहेब बाळासाहेब अशा घोषणा सुरू झाल्या. अखेर गुप्ता यांनी भाजपची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. भाजपचा असा कोणताही हेतू नाही, मित्रपक्षांनाही भाजप तितकेच महत्व दिले जाते, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. तसेच वातावरण चिघळू नये म्हणून युवासेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

तसेच हे तंत्रज्ञानासंबंधीचे व्याख्यान आहे, येथे राजकारण आणू नये, असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितले. दरम्यान, मोदी यांच्या मुंबईत झालेल्या महागर्जना सभेनंतर शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले होते. या सभेत मोदीयांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा उल्लेख टाळला होता. त्यानंतर शिवसेनेच्या मित्रपक्षांची आणि नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली होती आणि भाजपच्या अशा वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. त्याचेच पडसाद युवासेनेच्या अलिबाग येथील अधिवेशनात दिसले.