मुंबई महापालिकेच्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रेंचा अखेर राजीनामा

दहिसर – शिवसेना नगरसेविकांच्या अपमानास्पद वागणुकीचं प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर कारवाई होत नसल्यानं अखेर आज दहिसर पूर्वच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर आमदार विनोद घोसाळकरांनी बदनामी केल्याचा पुनरुच्चार शीतल म्हात्रेंनी केला आहे. नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाचं काम मात्र करत राहणार असंही शीतल म्हात्रेंनी स्पष्ट केलं आहे.

सुसंस्कृत महिलांनी राजकारणात येण टाळा, इथे राक्षस आहेत. आमदार घोसाळकर एक विकृत व्यक्ती आहेत. त्यांनी वेळोवेळी माझ्या कामात अडथळा आणला असे अनेक आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं. आज सकाळी प्रकृती ठिक नसल्यानं शीतल म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी पक्षांतर्गत वादामुळंच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर त्यांनी देखील याला दुजोरा देत न्याय न मिळत असल्यानं आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

शिवसेनेतल्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्याच नगरसेविकांच्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप केला होता. याचप्रकरणी कैफियत मांडण्यासाठी शुभा राऊळ आणि शीतल म्हात्रे यांच्यासह इतर नगरसेविका उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होत्या. पण गेल्या 10 दिवसांपासून त्यांना उद्धव यांच्या जवळचे लोक भेटू देत नसल्यानंच शुभा राऊळांनी आपल्या फेसबुक स्टेटसमधूल आपली कैफियत माडण्याचा प्रयत्न केला होता. पण या साऱ्या प्रकाराला अंतर्गत प्रश्न सांगून उद्धव ठाकरेंनी आमदार विनोद घोसाळकरांना पाठिशी घासलण्याचाच प्रकार केला. त्यामुळं अखेर शीतल म्हात्रे यांनी राजीनामा देवून पक्षनेतृत्वाविषयी आपली नाराजी स्पष्ट केली.

Leave a Comment