प्राणघातक औषधी चाचण्या

कोणत्याही औषधाचा आधी प्राथमिक अवस्थेत शोध लागतो. मात्र ते औषध निश्‍चित स्वरूपात उपयुक्त आहे की नाही हे पाहिल्याशिवाय त्याच्या वापराला परवानगी दिली जात नाही. आधी त्या औषधाच्या प्राण्यावर चाचण्या घेतल्या जातात. उंदीर, माकड या प्राण्यांचा वापर केला जातो. औषधे घातक असतील तर त्याचे घातक परिणाम या प्राण्यांवर दिसून येतात आणि ते प्राणी बिचारे ते परिणाम सहन करतात. त्याशिवाय त्यांना पर्याय नसतात. त्यांच्यावतीने आवाज उठविणारा कोणी नसतो. परंतु अशाच चाचण्या जर माणसांवर सुरू केल्या तर मात्र त्या औषधांच्या घातक परिणामांवर कुणीतरी आवाज उठवतोच. त्यामुळे कोणत्याही औषधांची माणसांवरची चाचणी कशी घ्यावी याला काही नियम आहेत आणि माणसां वरच्या या चाचण्या सरकारच्या निगराणीखाली कराव्या लागतात. अशा सरकारी देखरेखी खाली चाचण्या करायच्या झाल्यास त्यासाठी निवडले जाणारे स्वयंसेवक काळजीपूर्वक निवडावे लागतात. त्यांच्यावर केली जाणारी चाचणी कशाची आहे आणि तिचे परिणाम काय होणार आहेत याची जाणीव त्या स्वयंसेवकाला आणि सरकारी अधिकार्‍यांना द्यावी लागते. शिवाय या कामात गुंतलेल्या स्वयंसेवकांना काही पैसेसुध्दा द्यावे लागतात.

हे सारे टळावे म्हणून काही कंपन्या सरकारला न कळवता मानवी चाचण्या घेत असतात. अशा प्रकारे चाचण्या घेणे कायद्याला धरून नाही आणि या चाचण्यांमध्ये एखाद्या माणसाला काही दगाङ्गटका झाला किंवा त्याच्यावर दीर्घकाळ जाणवतील असे परिणाम झाले तर त्याची भरपाई कंपनीला द्यावी लागते आणि अशी चाचणी बेकायदेशीर असल्यास कंपन्या हात झटकून मोकळ्या होतात. भरपाई द्यावी लागू नये म्हणून काही कंपन्या काही डॉक्टरांना हाताशी धरून बेकायदा चाचण्या घेत आहेत आणि त्यामुळे भारतात अनेक लोक मरण पावलेले आहेत. कित्येक जण वेडे झाले आहेत. मात्र या गोष्टीची कोणीही दखल घेत नाही. जगाच्या बाजारात क्लिनीकल ट्रायल्स म्हणजेच या मानवी चाचण्या घेणे हा एक व्यवसाय झाला आहे आणि त्यामध्ये अशा गैरप्रवृत्ती शिरलेल्या आहेत.

रशियामध्ये तर अशा प्रकारचा व्यवसायच वाढीला लागला आहे. भारतातही चोरी छुपे असे व्यवसाय सुरू आहेत. या व्यवसायात शिरलेले लोक पैसा कमविण्यासाठी किती हपापलेले आहेत. हे त्यांच्या माणसांच्या निवडीवरून लक्षात येते. काही कंपन्यांनी चाचणीसाठी एक दिवसाचे मूल निवडून त्याचाही वापर केला आहे. काही लोकांना अशा चाचण्यांची माहिती असते आणि ते चाचण्यांच्या बाबतीत जागरुक असतात. त्यामुळे चाचण्यांसाठी माणसे मिळणे अवघड जाते. अशा वेळी मतिमंद मुला-मुलींना आणि वेड्यांना भरीस घालून त्यांचा वापर केला जातो. भारतामध्ये किडनी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि किडनी मिळविणारी तसेच ती काढून घेणारी सोनेरी टोळी गावोगाव कार्यरत आहे. तसेच मानवी चाचण्यांचेही रॅकेट कार्यरत आहे आणि त्या रॅकेटमध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत आहे.

इंदूर येथील स्वास्थ अधिकार मंच या स्वयंसेवी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या चाचण्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संस्थेच्या जनहित याचिकेमध्ये या बेकायदा चाचण्यांमधून किती लोक मरण पावले आहेत. याची माहिती दिलेली आहे. संस्थेच्या माहितीनुसार भारतात विविध शहरांमध्ये चालू असलेल्या अशा बेकायदा चाचण्यांमध्ये २००८ साली २८८ लोक जीवास मुकले. २००९ साली हा आकडा ६३७ तर २०१० साली तो ५९७ होता. अशा रितीने गेल्या चार वर्षात १६०० लोकांना या रॅकेटचे बळी ठरावे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात या संस्थेचा अर्ज दाखल झाल्यानंतर न्यायालयाने सरकारला निवेदन सादर करण्याचा आदेश दिला. मात्र सरकारतर्ङ्गे चौकशी सुरू आहे, समिती नेमली आहे, अहवालाची प्रतिक्षा आहे अशी ठराविक छापाची उत्तरे देण्यात आली. त्यावर न्यायालयाने आठवड्याच्या आत उपाय योजण्याचा आदेश दिला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment