खट्याळ कुत्र्यामुळे मालक संकटात

न्यूयॉर्क – खट्याळ आणि खोडकर कुत्र्याने मालकाला चांगलेच अडचणीत आणल्याची घटना येथे घडली. या कुत्र्याने मालकाच्या नकळत कार चालविली आणि समोरच्या गाडीला धक्का देऊन अपघात केला.

समजलेल्या माहितीनुसार स्पोकेन येथील रहिवासी जेसन मार्टिन आपल्या टॉबी नावाच्या कुत्र्याला घेऊन दुकानात गेले होते. मात्र कुत्र्यासह दुकानात जाण्याऐवजी त्यांनी टॉबीला गाडीतच ठेवले. कसे काय कोण जाणे पण टॉबीने चक्क गाडीचा गिअर टाकला आणि कार चालवायला सुरवात केली. सिग्नलपाशी थांबलेल्या एका महिलेच्या कारला या कारची धडक बसली. या अपघातात गाडीचे टायर खराब झाले. जिच्या गाडीला धडक बसली ती महिलाही कांही काळ स्तंभित झाली. कारण स्टीअरिंग व्हीलवर कुत्रा आहे आणि तो गाडी चालवतोय हे दृष्य तिने कधीच पाहिले नव्हते.

इकडे मार्टिनला कुत्र्याने गाडी नेल्याचे कळलेच नव्हते. अन्य कुणीतरी त्याला त्याच्या गाडीने दुसर्‍या गाडीला धडक दिल्याची बातमी दिली तेव्हा कुत्र्याने केलेला पराक्रम त्याला समजला. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल मार्टिनवर आता पोलिस केस होणार आहे.

Leave a Comment