क्रांतिकारी लेखक काळाच्या पडद्याआड

१९७२ सालचे वातावरण ज्यांना आठवत असेल त्यांना नामदेव ढसाळ म्हणजे काय हे चांगलेच समजते. त्यावेळी भारतीय स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा झाला होता. मात्र या देशातल्या दलित समाजाला या स्वातंत्र्याने काय दिले असा बंडखोर प्रश्‍न काही तरुण विचारायला लागले होते. अशा तरुणांमध्ये नामदेव ढसाळ हे अग्रणी होते. त्यांनी याच विचारातून दलित पँथर्स ही संघटना स्थापन केली होती. ते बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार करता यावेत यासाठी मोठ्या पैशाची गरज होती. परंतु नामदेव ढसाळ यांनी पैशाचे राजकारण केले नव्हते आणि राजकारणातून पैसाही कमावला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी फंड उभा करावा लागला. शेवटी वयाच्या अवघ्या ६४ व्या वर्षी काल त्यांचे निधन झाले. क्रांतिकारी विचारांचा साहित्यिक, लेखक आणि दलित नेता आपल्यातून गेला आहे. महाराष्ट्रातले अनेक पुढारी महाराष्ट्र हे कसे पुरोगामी राज्य आहे हे सांगत असतात आणि पदोपदी त्याचा जप करत असतात. परंतु प्रत्यक्षातल्य आयुष्यामध्ये याच राज्यातले पुढारी या पुरोगामित्वाला पदोपदी बट्टा लावत असतात.

या महाराष्ट्रामध्ये दलित आणि मागासवर्गीयांचे जीवन कमालीचे असुरक्षित आहे. त्याचाच अनुभव घेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातले दलित स्त्री पुरूष अतीशय लाचार जीवन जगत होते. अन्याय सहन करत होते. त्यांच्या अन्यायाला कोणी वाचा फोडत नव्हते आणि आर्थिक विपन्नावस्थेमुळे हा वर्ग तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा तसा निरुपायाने जगत होता. ज्या दलितांना शक्य झाले त्यांनी पोटापाण्यासाठी मुंंबई सारखी शहरे जवळ केली पण तिथेही त्यांना जाती प्रथेचे आणि विषमतेचे चटके सहन करावे लागत होते. त्यातूनच मुंबईच्या वरळी भागात असलेल्या बीडीडी चाळीमध्ये सवर्ण विरुध्द दलित अशी मोठी दंगल पेटली. ही दंगल रोजच्या मारामार्‍या, दगडफेक, भोसकाभोसकी असे प्रकार महिनाभर सुरू होते. दलितांचा कोणी वाली नव्हताच असे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत काम केलेल्या रिपब्लिकन पार्टीच्या काही नेत्यांनी दलितांचा आवाज म्हणून ही पार्टी स्थापन केली होती. परंतु या पार्टीच्या नेत्यांना सत्तेची चटक लागली आणि त्यामुळे दलितांवर होणार्‍या अन्यायाच्या बाबतीतील त्यांची संवेदना बोथट झाली. याच काळात नामदेव ढसाळ, राजा ढाले असे आक्रमक प्रवृत्तीचे तरुण दलितांच्या अवस्थेची चिंता करायला लागले होते. त्यांच्या चर्चेतून, दलितांची आक्रमक संघटना उभी केली पाहिजे असा विचार पुढे यायला लागला.

अमेरिकेतील अशाच प्रकारच्या ब्लॅक पँथर मुव्हमेंट या चळवळीच्या धर्तीवर आपणही भारतामध्ये दलित पँथर ही संघटना स्थापन केली पाहिजे. असे या लोकांनी ठरवले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये दलितांच्या समाजकारणाचे आणि राजकारणाचे नवे पर्व सुरू झाले. दलितांवर अन्याय अत्याचार होताच दलित पँथर्स तिकडे धाव घ्यायला लागले आणि राज्याच्या खेड्यापाड्यातून पसरलेल्या पिचलेल्या, दबलेल्या दलितांचा आवाज बुलंद झाला. कोणी दलितांवर अन्याय केला तर त्याचा प्रतिकार संघटितपणे होऊ शकतो असे वातावरण निर्माण झाले. मात्र पुढे नामदेव ढसाळ आणि अन्य पँथर नेते यांच्यामध्ये काही मतभेद निर्माण झाले. आपण दलितांचा आवाज संघटितपणे आणि आक्रमकपणे उमटवत आहोत परंतु समाजामध्ये पिचलेला आणि दबलेला वर्ग फार मोठा आहे. ते सगळेच दलित आहेत असे नाही. तेव्हा दलित पँथरच्या कक्षेमध्ये अशा सर्व उपेक्षित जातींना आणावे असा विचार नामदेव ढसाळ मांडायला लागले. अन्य पँथर्स नेत्यांना हा विचार पटला नाही. त्यामुळे पँथर चळवळीत फाटाफूट झाली. मात्र अशा प्रकारची चळवळ भारतात निर्माण झाली. तिने एक काळ गाजवला. या नव्या प्रवाहाचे धुरिणत्व नामदेव ढसाळ नावाच्या अती संवेदनशील साहित्यिक नेत्याकडे होते. याची इतिहासात नक्कीच नोंद झाली. दलितांचा आवाज बुलंद केला पाहिजे परंतु त्यासाठी पँथर्सनी वेगळी चूल न मांडता समाजाच्या सर्व प्रवाहांशी एकरुप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे ढसाळ यांचे मत होते.

दलित पँथर्सच्या स्थापनेशिवाय नामदेव ढसाळ यांनी मराठी साहित्यातसुध्दा आपल्या नावाची वेगळी मुद्रा निर्माण केली आहे. १९५५ ते ६० च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठी साहित्यात दलित साहित्याचा नवा प्रवाह वाहायला सुरूवात झाली होती. त्यात बाबुराव बागुल हे पहिल्या पिढीतले लेखक म्हणून पुढे आले होते. नामदेव ढसाळ यांच्या मनावर बाबुराव बागुल यांचा मोठा प्रभाव होता. त्यांनीही ७०-७२ च्या सुमारास लिहायला सुरूवात केली. मात्र कोणताही साहित्यिक लेखन करत असताना ते लेखन ज्या वातावरणातले असते त्या वातावरणाची भाषा वापरत असतो. नामदेव ढसाळ यांचा जन्म मुंबईच्या वेश्या वस्तीत गेला असल्यामुळे त्यांच्या साहित्यात तिथल्या लोकांचीच भाषा येत होती आणि त्यामुळे मराठी साहित्यात काही काळ मोठी खळबळ माजली होती. कारण तोपर्यंतच्या काळात साहित्यावर मध्यमवर्गीयांचा पगडा होता आणि त्यांच्याच भाषेत साहित्य लिहिले जात होते. ढसाळांच्या भाषेने खळबळ माजली तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही आणि तोच पुढे प्रवाह झाला. त्यांना साहित्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले. असा हा परिवर्तनवादी साहित्यिक नेता आपल्यातून गेला हे मराठी भाषेचेही मोठे नुकसान आहे.

Leave a Comment