अमरकंटक – मैया नर्मदेचे उगमस्थान

मध्यप्रदेशातील अमरकंटक हे स्थान केवळ हिल स्टेशन म्हणूनच पर्यटकांना आकर्षिक करते असे नाही तर हे हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थानही आहे. पवित्र नर्मदा नदीचे उगमस्थान म्हणून या क्षेत्राला भाविक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. असे सांगितले जाते की सरस्वती नदीमध्ये सात दिवस, यमुनेत ३ दिवस, गंगेत १ दिवस स्नान करण्याने जे पुण्य मिळते ते नर्मदेच्या केवळ दर्शनाने मिळते. यामुळे या स्थानाचे फार महत्त्व आहे.

समुद्रसपाटीपासून १०६५ मीटर उंचीवरचे अमरकंटक निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे विंध्य आणि सातपुडा या पर्वतरांगा एकमेकींना छेदतात. त्यातूनच नर्मदा आणि सोन या दोन नद्यांचा उगम होतो. झुळझुळणारे झरे, दूरपर्यंत पसरलेल्या पर्वतरांगा, तलाव दाट झाडी आणि अतीव शांत वातावरण असलेल्या या स्थळावर पर्यटकांची बारमहा वर्दळ असते. निसर्गाने येथे आपले सौंदर्य नुसते उधळून दिले आहे.

या स्थानाचा उल्लेख पुराणातही आहे. आम्रकूट असे याचे पुराणात वर्णन येते. सप्तकुल पर्वतांतील हा एक भाग मानला जातो. येथे असलेली प्राचीन मंदिरे, मूर्ती महाभारताशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. भगवान शिवाची कन्या नर्मदा जीवनदायिनी नदीच्या रूपात येथे अवतरली. माता मर्मदेला दुर्गेची प्रतिकृती मानले जाते आणि त्या संदर्भातील अनेक मंदिरे येथे आहेत. नर्मदाकुंड मंदिर, कालजुरी कालमंदिर, जैनमंदिर ही येथील भेट देण्याजोगी कांही स्थळे.

अमरकंटकपासून जवळच कपिलधारा हा सुंदर धबधबा असून तेथे कपिल मुनींनी वास्तव्य केले होते असा समज आहे. येथे अनेक गुहा असून साधूसंन्यासी ध्यानधारणा करण्यासाठी येथे राहतात. येथे दाट जंगल आहे. तसेच दुधधारा, धुनीपानी, माईचा बगीचा, कबीर चबुतरा ही पाहण्यासारखी स्थळेही याच परिसरात आहेत. जबलपूरपासून अमरकंटक येथे जाणे सोयीचे असून त्यासाठी रस्तामार्ग अधिक सोयीचा आहे.