युती सरकारनेच टोलनाके सुरू केले- नारायण राणे

नवी मुंबई – कोल्हापूरमधील टोलनाक्याच्या प्रश्नावर शिवसेना राजकीय हस्तक्षेप करत असून टोलनाके युती सरकारच्या काळातच सुरू झाले होते हे त्यांनी विसरू नये, अशी चपराक उद्योगमंत्री नारायण राणे यांनी लगावली आहे. सिंधुदुर्गमधील आमनेसामने प्रसंगी शिवसैनिकांनी पोलिसांना मारहाण करून खाली पाडल्यामुळेच लाठीचार्ज करण्यात आला होता याची आठवणही त्यांनी पत्रकारांना करून दिली.

नेरूळ येथे सिडको संचालक नामदेव भगत यांच्या अखिल आगरी कोळी संस्थेच्या वतीने आयोजित आठव्या आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी आगरी कोळी समाजाच्या परंपरेचे पैलूही त्यांनी उपस्थितांसमोर उलगडले. पूर्वीचा आगरी समाज आता बदलला पाहिजे. या समाजाने प्रगतीचे धडे आत्मसात करावेत. चेंबूरमध्ये वास्तव्य केले असल्याने मी हा समाज जवळून बघितला आहे. या समाजात चांगले होतकरू तरुण व कलाकार तयार झाले आहेत. मात्र, या समाजाच्या जीवावर खूप लोकांनी राजकारण केले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राजकारण करणा-यांनी या आगरी कोळी समाजाला पुढे नेण्यासाठी काय केले? असा सवाल राणे यांनी केला. मुंबईचा ख-या अर्थाने मालक असलेल्या आगरी कोळी समाजातील तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. या समाजाला मोजक्याच लोकांनी पुढे नेण्याचे काम केले असल्याने या समाजाच्या आथक स्थितीचे आकलन करून समाजाला प्रगतीचे धडे दिले पाहिजेत, असे ते म्हणाले. मुंबईच्या इतिहासात आगरी कोळी सामाजाच्या योगदानाची नोंद घ्यावीच लागेल. यामुळे आता फक्त सांस्कृतिक कार्यक्रमच नको तर या समाजाला विचार वाटावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या वेळी नारायण राणे यांच्या हस्ते आगरी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिक्षणक्षेत्रासाठी बाळासाहेब म्हात्रे यांना, अध्यात्मासाठी महादेवबुवा शहाबाजकर व संगीत क्षेत्रातील योगदानासाठी हंसारामबुवा नेरूळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी युवा नेते वैभव नाईक, माजी आमदार मंदा म्हात्रे, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, नगरसेविका इंदुमती भगत, हेमांगी सोनवणे, ‘स्वाभिमान’चे प्रदीप गवस, अजित सावंत, जयंत नाईक, एकनाथ दुखंडे आदी उपस्थित होते.