
मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँड स्लॅम स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या हार्डकोर्टावर होणा-या या स्पर्धेत गतविजेता सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचं आणि अग्रमानांकीत राफेल नदाल यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. त्यािमुळे आगामी काळात टेनीसप्रेमींना मातब्बरांच्या लढती पाहवयास मिळणार आहेत. या स्पर्धेचा विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अग्रमानांकीत राफेल नदाल दुखापतीमुळे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धेला मुकावे लागले होते. तर नोव्होक जोकोविच या स्पर्धेत तीन वर्षांपासून अजिंक्य आहे. २०१२ मध्ये या दोघांमध्ये तब्बल सहा तास रंगलेली फायनल आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन ओपनचे चारवेळा विजेतेपद पटकवणारा रॉजर फेडरर यंदा तरी आपला बॅड पॅच संपवणार का याची सर्वांना उत्सुकता आहे.
दुसरिकडे महिला गटात सेरेना विल्यम्सचे पारडे जड आहे. ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांच्या १८ ग्रँड स्लॅम विजेतेपदाची बरोबरी करण्याची सेरेनाला संधी आहे. गेल्यावर्षी ती केवळ पाच स्पर्धा हरली असून यंदाच्या सराव स्पर्धेचंही तिनं विजेतेपद मिळवलंय. त्यामुळे संभाव्य विजेपदासाठी सेरेनाच पहिली पसंती आहे. माजी विजेत्या मारिया शारापोव्हामध्ये सेरेनाला धक्का देण्याची क्षमता असून मात्र तिनं आपल्या खेळात सातत्य आणण्याची आवश्यकता आहे. तर गतविजेत्या व्हिक्टोरिया अझारेन्काच्या कामगिरीचीही सर्वांना उत्सुकता असेल.