बालपणीची उपासमार घातक

ज्या गरीब मुलांना शाळेत जाताना पोटभर जेवण मिळत नाही त्यांचे वर्गात अभ्यासाकडे लक्ष लागत नाही आणि त्यांचे शैक्षणिक प्रगती खुंटते. एका बाजूला शारीरिक सक्षमताही कमी होते आणि शिक्षणातही प्रगती होत नाही. म्हणून शाळेतल्या गरीब मुलांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना केंद्र सरकारने आखलेली आहे आणि त्यावर सरकार अब्जावधी रुपये खर्च करते. या योजना सुरू झाल्यापासून शाळांमधली मुलांची उपस्थित वाढलेली आहे आणि त्यांच्या कुपोषणाचे त्यांच्या शरीरावर होणारे परिणामसुध्दा कमी होताना दिसत आहे. लहान मुलांची होणारी उपासमार ही केवळ शारीरिक आणि शैक्षणिकचदृष्ट्या वाईट असते असे नाही तर मानसिकदृष्ट्यासुध्दा घातक असते ज्या लहान मुलांना लहानपणी सातत्याने उपासमार सहन करावी लागते त्यांच्यामध्ये काही मानसिक विकृती निर्माण होतात आणि प्रौढावस्थेमध्ये त्यांच्या नैराश्यासरखे मानसिक विकार बळावतात. असे एका संशोधनात आढळून आले आहे.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑङ्ग नेब्रास्का-लिंकन या संस्थेने उपासमार होणार्‍या मुलांपैकी बहुसंख्य मुलांमध्ये तारुण्यानंतर नैराश्य आणि सातत्याने जाणवणारी डोकेदुखी बळावण्याचा जास्त धोका असतो असे दाखवून दिलेले आहे. या विकारांना सातत्याने बळी पडणार्‍या कामगारांची पाहणी करण्यात आली आणि त्यांच्या बालपणाची माहिती काढण्यात आली तेव्हा असे दिसून आले की त्यांच्यापैकी ४४ टक्के लोकांना बालपणी सातत्याने उपासमार सहन करावी लागलेली होती. या संस्थेने ४ हजार ३०० अशा कामगारांची पाहणी केली आणि त्यांना असे दिसून आले की १० व्या- १२ व्या वर्षी सहन केलेली उपासमार पुढे २५ ते ६४ या वयोगटातसुध्दा त्रासदायक ठरू शकते.

या लोकांपैकी ज्यांना आपल्या बालपणामध्ये आई आणि वडील या दोन्ही पालकांचा भरपूर सहवास मिळालेला असतो त्यांच्यामध्ये हे विकार ङ्गारसे बळावत नाहीत असेही दिसून आले. म्हणजे अन्नपाण्यावाचून होणारी उपासमार हीच केवळ त्रासदायक असते असे नाही तर प्रेमाची उपासमारसुध्दा त्रासदायक ठरते. बालपणी मातापित्यांच्या प्रेमाला पारखे झालेली मुले मोठेपणी स्वतः प्रेमळ असत नाहीत असेही दिसून आले आहे.