संगीता रिचर्ड म्हणतात, होय, माझे शोषण करण्यात आले

न्यूयॉर्क – वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेवरून भारत व अमेरिकेमध्ये निर्माण झालेले राजकीय वादळ आता शमण्याची शक्यता निर्माण झाली असताना या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या संगीता रिचर्ड या खोब्रागडे यांच्या मोलकरणीने पहिल्यांदाच आपले मौन सोडले आहे. खोब्रागडे यांच्याकडे काम करत असताना आपले शोषण करण्यात आल्याचा आरोप रिचर्ड हिने केला असून कोणालाही आपल्यावर अत्याचार करु देऊ नका, असे आवाहन तिने इतर घरगुती काम करणार्‍या मोलकरणींना केले आहे. रिचर्ड हिचे या प्रकरणामधील हे पहिलेच सार्वजनिक निवेदन आहे.

आपल्या कुटुंबासाठी अमेरिकेत काही वर्षे काम करून नंतर भारतात परतण्याचा आपला विचार होता, असे रिचर्ड हिने म्हटले आहे. मी अमेरिकेत काम करायला आल्यानंतर परिस्थिती इतकी बिघडेल, असा विचार केला नव्हता. मला कामातून झोपण्यासाठी, खाण्यासाठी वा माझ्याकरता म्हणून वेळच नसे. या वागणुकीमुळे मला भारतामध्ये परतू द्यावे, अशी मी विनंती केली. परंतु माझी ही विनंती नाकारण्यात आली. अशा प्रकारे कोणालाही आपल्यावर अत्याचार करु देऊ नका, असे माझे इतर मोलकरणींना सांगणे आहे,’’ असे रिचर्ड हिने सांगितले.

अमेरिकेतील सेफ होरायझन ही संस्था खोब्रागडे यांच्या विरोधातील प्रकरणामध्ये रिचर्ड हिचे प्रतिनिधीत्व करत आहे. या संस्थेने खोब्रागडे यांच्याविरोधातील आरोपनिश्‍चितीचे स्वागत केले आहे. अमेरिका अशा कर्मचार्‍यांवरील अत्याचार सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश या प्रकरणाने अमेरिकेतील इतर देशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांना दिला गेला आहे,’’ अशी प्रतिक्रिया या संस्थेचे अधिकारी ऍव्हलॉय लॅनींग यांनी व्यक्त केली आहे. खोब्रागडे यांच्याविरोधात व्हिसागैरव्यवहार व खोटी माहिती दिल्याप्रकरणी आरोपनिश्‍चिती करण्यात आली आहे; मात्र संपूर्ण राजनैतिक सुरक्षेचा (डिप्लोमॅटिक इम्युनिटी) दर्जा मिळाल्याने अमेरिका सोडण्यास त्यांना परवानगी देण्यात आली आहे.